नवी दिल्ली - देश कोरोनाचा सामना करत असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठीदेशातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. मात्र तरीही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 56 हजारांवर गेला आहे. 1800 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक असून यानंतर आता गुजरात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर आली आहे.
गुजरातमध्ये वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत राज्यात 396 लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान गुजरात सरकारने मोठा दावा केला आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी आयुर्वेदिक काढा उपयोगी पडत असल्याचा दावा सरकारने केला आहे. मात्र गुजरातच्या या दाव्यावर सोशल मीडियात अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. गुजरातच्या मुख्य सचिव जयंती रवि यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गुजरातमध्ये राज्यात 3585 लोकांना आयुर्वेदिक काढा देण्यात आला. तर 2625 लोकांना होमिओपॅथी औषधे देण्यात आली. यातील फक्त 11 लोकांनाच कोरोना झाल्याचं समोर आलं. त्यांना कोरोना झाला कारण त्यांनी डोस पूर्ण केला नाही अशी माहिती जयंती रवि यांनी दिली आहे. क्वारंटाईन झालेल्या लोकांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हा उपाय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
जयंती रवि यांचे हे वक्तव्य डीडी न्यूज गुजरातीच्या ट्विटर हँडलवरसुद्धा आहे. गुजरात सरकारने याबाबत आयुष मंत्रालयाला माहिती दिली आहे. यात क्वारंटाईन झालेल्या 6000 हजार लोकांना आयुर्वेदिक काढा दिला आणि त्याचा फायदाही झाला. ज्या लोकांनी डोस पूर्ण केला त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याचं यामध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : दारूमुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा, 'या' सरकारने सुरू केली 'ऑनलाईन टोकन' व्यवस्था
CoronaVirus News : धक्कादायक! डोळ्यांमधूनही होतो कोरोनाचा संसर्ग; संशोधकांचा दावा