नवी दिली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. भारतही या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र याच दरम्यान देशातील कोरानाग्रस्तांचा आकडा हा सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 49,000 वर पोहोचला आहे. तर 1600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असून तब्बल 15 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री बैठक बोलावून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत लवकरच चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे. 'महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी 34 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याची स्थिती चिंता व्यक्त करण्यासारखी आहे. राज्यात होत असलेला कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पुढे काय करता येईल यासंदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक बोलावणार आहोत. त्या बैठकीत आगामी नियोजनासंदर्भात कृती धोरण ठरवलं जाईल' असं केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे.
राज्यात मंगळवारी 841 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून रुग्णसंख्येने 15 हजार 525 चा आकडा गाठला आहे. तर दिवसभरात 34 मृत्यू झाले असून बळींचा आकडा 617 वर पोहोचला आहे. कोरोनाच्या कठीण समयी दिलासाजनक बाब म्हणजे, राज्यात दिवसभरात 354 तर आतापर्यंत 2 हजार 899 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत मंगळवारी 625 रुग्णांचे निदान झाले असून रुग्णसंख्येने 9 हजार 945 चा टप्पा गाठला आहे. शहर उपनगरात दिवसभरात 26 मृत्यू झाले असून कोरोनाचे एकूण 387 बळी गेले आहेत.
केंद्र सरकारच्या कोरोना (कोविड-19) पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी दिलेल्या बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार माहिती देण्यात येते. तर राज्य शासनाचा अहवाल इंडियन क्लिनिकल मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या माहितीनुसार करण्यात आला आहे. राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका व जिल्ह्यांचे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार डेटा क्लिनिंग झाल्यामुळे आकडेवारीत वाढ झाली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या आकडेवारीत बदल दिसून येतो आहे. राज्यात गेल्या 24 तासांत नव्याने 841 रुग्णांची नोंद झाली असून, यातील 143 रुग्ण डेटा क्लिनिंग प्रक्रियेमुळे वाढले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये अडकलेले तब्बल 80 हजार लोक 70 विशेष ट्रेनने परतले घरी
CoronaVirus News : कोरोनाचा फटका! लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड