नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,09,50,201 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 12,881 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 101 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,56,014 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा देशात धोका वाढला असून लोकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नव्या गाईडलाईन्स (New Guidelines For Air Travellers) जारी केल्या आहेत.
नव्या गाईडलाईन्स 2 ऑगस्ट 2020 च्या जुन्या गाईडलाईन्सला रिप्लेस करतील आणि या गाई़डलाईन्स 22 फेब्रुवारीच्या रात्री 11.59 वाजेपासून लागू होणार असल्याची माहिती मिळत आहे. गाईडलाईन्सनुसार, प्रवासापूर्वी एअर सुविधा पोर्टलवर सेल्फ डिक्लेरशन फॉर्म जमा करावा लागणार आहे. कोरोनाचा निगेटीव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्टही अपलोड करावा लागणार असून हा रिपोर्ट 72 तासांपेक्षा जुना नसावा. गाईडलाईन्सनुसार, सर्व प्रवाशांना RT-PCR टेस्ट रिपोर्टच्या ऑथेन्टिसिटीचं डिक्लेरेशन देणेही गरजेचं असेल. जर हे खोटं आढळून आलं तर दंडात्मक कारवाई होईल.
फक्त "या" लोकांनाच मिळणार दिलासा, असणार सूट
प्रवाशांना आपल्या एअरलाईनच्या माध्यमातून एअर सुविधा पोर्टल या उड्डाण मंत्रालयाला ही अंडरटेकिंग देणं गरजेचं असणार आहे. गरज असल्यास ते 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन किंवा सेल्फ हेल्थ मॉनिटरिंगचा निर्णय मानतील. गाईडलाईनमध्ये त्या लोकांना दिलासा देण्यात आला आहे, जे आपल्या कुटुंबातील कुठल्या सदस्याच्या मृत्यू झाल्याने भारतात येत आहेत. अशा लोकांना कोणत्याही नकारात्मक आरटी-पीसीआर रिपोर्टची गरज नसणार आहे. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा वाढता धोका पाहता या नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.
23 मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा स्थगित
कोरोनाच्या या महाभयंकर संकटात गेल्या 23 मार्चपासून नियमित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान सेवा स्थगित आहे. तर, वंदे भारत अभियान आणि एअर बबल सिस्टमअंतर्गत मे महिन्यापासून काही निश्चित देशांसाठी विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या संचालनाची परवानगी दिली आहे. भारताने अमेरिका, ब्रिटन, केनिया, भूतान आणि फ्रान्ससह 24 देशांसोबत एअर बबल करार केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे..