नवी दिल्ली : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी केंद्राने लॉकडाऊन जाहीर केला. यानंतर लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासांमध्ये आजपर्यंतचे सर्वाधिक मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. तर तब्बल ३९०० पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामुळे राज्य सरकारांबरोबरच केंद्राचेही धाबे दणाणले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नेहमीप्रमाणे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही चिंताजनक माहिती दिली आहे. देशात कोरोनाचे एकूण ४६४३३ रुग्ण झाले असून गेल्या २४ तासांतील आकडा चिंता वाढविणारा आहे. या काळात देशभरात ३९०० नवीन रुग्ण सापडले आहेत. तर १०२० रुग्ण बरे झाले आहेत. धक्कादायक म्हणजे आज सर्वाधिक १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बरे झालेल्या रुग्णांची सरासरी वाढली असून ती 27.41% झाली असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले आहे.
काही राज्यांकडून वेळेवर रुग्ण संख्या आणि मृतांची आकडेवारी मिळत नाही. ती आल्यानंतर आज हा आकडा अचानक वाढल्याचे दिसून आले आहे, असे अग्रवाल यांनी आजच्या विक्रमी रुग्ण वाढीवर सांगितले. देशातील रुग्णांना सरकारी आणि खासगी हॉस्पिटलद्वारे कोरोनावर उपचार मिळतीय याची खात्री करायला हवीय. तसेच गंभीर असलेल्या रुग्णांवरही उपचार नीट व्हायला हवेत, याची काळजी घ्यावी लागेल असेही अग्रवाल यांनी सांगितले.
काही कार्यालये सुरु झाली आहेत. त्यांच्या व्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांसाठी मास्क आणि सॅनिटायझरची सोय करायला हवी. सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवे. तसेच कर्मचाऱ्यांना आरोग्य सेतू अॅपवर रजिस्टर करावे लागेल, असे आरोग्य मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
महत्वाची बातमी...
दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल