नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अनेक देश कोरोना संकटाचा सामना करत आहेत. काही देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोविड-19 वर प्रतिबंधक लस बनविण्यासाठी जगात अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 16,922 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 418 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या चार लाख 73 हजारांच्यावर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 14,894 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (25 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 16,922 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 4,73,105 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 14 हजारांवर पोहोचला आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 1,86,514 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 2,71,697 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोना संसर्गासारखी लक्षणे दिसणाऱ्या सर्वांचीच या आजाराबाबतची वैद्यकीय चाचणी होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने या सुविधेचा विस्तार झाला पाहिजे, असे आयसीएमआरने म्हटले आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारांसंदर्भात नवी धोरणे राबविण्याविषयी आयसीएमआरने आपले विचार मांडले आहेत. त्यात म्हटले आहे की, कोरोना संशयितांची चाचणी करावी. त्यानंतर निदान झाल्यानंतर, रुग्णांवर उपचार करावेत. याच मार्गाने कोरोना संसर्गाशी मुकाबला करून अनेकांचे प्राण वाचविता येतील. अधिकाधिक लोकांची कोरोना चाचणी करता यावी म्हणून या सुविधेचा विस्तार केला पाहिजे.
देशाच्या प्रत्येक भागामध्ये ही चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. असे झाल्यास या साथीविरोधात अधिक प्रभावीपणे लढा देता येईल. कोरोनाशी कसे लढावे, याबद्दल आयसीएमआरने 18 मे रोजी एक धोरण जाहीर केले होते. त्यात आणखी बदल करून नवे धोरण या संस्थेने जाहीर केले आहे. इन्फ्लुएंझा तापासारखी लक्षणे दिसू लागताच सात दिवसांच्या आत त्या रुग्णाची कोरोना चाचणी झाली पाहिजे. कोरोना साथीचा मोठ्या प्रमाणात फैलाव झालेल्या भागांत राहाणारे तसेच इन्फ्लुएंझा तापासारखी लक्षणे जाणवणारे रुग्ण, कोरोना रुग्णांची सेवा करणारे आरोग्यसेवक या सर्वांची कोरोना चाचणी झाली पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या
बापरे! राज्यसभेतील 16 खासदार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; 'या' पक्षाचे सर्वात धनवान
'MASK'ला हिंदीत काय म्हणतात माहितीय का?, बिग बींनी शोधलं उत्तर
"मोदी सरकारने कोरोना महामारी, पेट्रोल डिझेलच्या किमती अनलॉक केल्या"
"विसरला असाल तर लक्षात आणून द्यावं म्हटलं"; 'तो' फोटो शेअर करत जितेंद्र आव्हाडांचा भाजपला टोला