नवी दिल्ली - देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 79 लाखांचा टप्पा पार केला असून कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,19,502 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र कोरोनाच्या संकटात सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. तब्बल 4 महिन्यांनंतर पहिल्यांदाच कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळाली आहे.
देशात गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा वेग हा थोडा मंदावताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 36,469 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 488 जणांचा मृत्यू झाला आहे. 18 जुलै रोजी कोरोनाचे 34,884 रुग्ण आढळले होते. त्यानंतर दररोज रुग्णांची संख्या वाढतच चालली होती. 17 सप्टेंबरपर्यंत देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत होती. त्यानंतर मात्र दररोज रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. ऑक्टोबर महिन्यात दररोज वाढणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या 50 हजारांपेक्षा कमी झाली आहे.
कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णाच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहेत. तब्बल 72 लाख लोकांनी कोरोनावर मात केली असून कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे. नव्या रुग्णांमध्ये या आठवड्यात (19- 25 ऑक्टोबर) सर्वात मोठी घट दिसून आली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सुमारे 16 टक्के कमी नवे रुग्ण आढळले. तर, मृतांची संख्या देखील या कालावधीत 19 टक्क्यांनी कमी राहिलेली आहे. या आठवड्यात 3.6 लाखांहून काहीसे अधिक रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
आशेचा किरण! कोरोनाच्या संकटात प्लाझ्मा थेरपी देतेय शुभ संकेत; रिसर्चमधून खुलासा
भारतात काही ठिकाणी कोरोनाग्रस्तांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार सुरू केले आहेत. प्रभावी औषध किंवा लस नसतानाही प्लाझ्मा थेरपी कोरोनाच्या उपचारात मोठ्या प्रमाणात प्रभावी असल्याचे सिद्ध होत असल्याची माहिती समोर आली होती. प्लाझ्मा थेरपीबाबत आता पुन्हा एकदा चांगले संकेत मिळत आहेत. देशातील काही कोरोना रुग्णांना त्याचा फायदा झाल्याची माहिती संशोधनातून मिळत आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि तमिळनाडूतील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमिऑलॉजीच्या संशोधकांनी मिळून एप्रिल ते जुलै या काळात देशातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचा अभ्यास केला. ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये (BMJ) हा रिसर्च प्रकाशित झाला आहे. 18 वर्षांहून अधिक वय असलेल्या आणि कोरोनाची सामान्य लक्षणं असणाऱ्या 464 रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीचा अभ्यास केला. प्लाझ्मा थेरपीमध्ये कोरोनातून ठिक झालेल्या व्यक्तींच्या रक्तातून प्लाझ्मा घेऊन कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात येतात. प्लाझ्मा थेरपी फायदेशीर असल्याचं म्हटलं जात असल्याने प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.