नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा धोका हा दिवसागणिक वाढत आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 11 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर आता देशातही कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा विस्फोट झाला असून देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 35,871 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 172 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तब्बल 101 दिवसांत ही मोठी वाढ झाली आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या एक कोटीवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 1,59,216 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (18 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 35,871 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,14,74,605 पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा दीड लाखांवर पोहोचला आहे.
भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 2,52,364 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,10,63,025 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. मार्चमध्ये आता नव्या रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. देशात लसीकरणाच्या मोहिमेला सुरुवात झाली असून आतापर्यंत लाखो लोकांनी लस घेतली आहे. काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठा वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. महाराष्ट्र, पंजाब, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधील कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. जवळपास 82 टक्के नवीन केसेस या सहा राज्यांशी संबंधित आहेत.
धोका वाढला! गुजरातमध्ये कोरोनाचा कहर, प्रशासनाच्या चिंतेत भर; 'या' 4 शहरांत नाईट कर्फ्यू
गुजरातमध्ये देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने राज्य सरकारने मंगळवारी चार मोठ्या शहरांत नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये दिवसाला 800 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार 17 मार्चपासून ते 31 मार्चपर्यंत अहमदाबाद, सूरत, राजकोट आणि वडोदरा या चार मोठ्या शहरांत नाईट कर्फ्यू लागू होणार आहे. हा नाईट कर्फ्यू रात्री 10 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहील. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना व्हायरस टास्क फोर्सच्या कोर कमिटीची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीनंतर राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. गुजरातमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही दोन लाखांच्या वर गेली आहे. तर चार हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. काहींनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे.