नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनापुढे प्रगत देशही हतबल झाले आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्ताची संख्या ही तब्बल 11 कोटींच्या वर गेली आहे. तर लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांचा आकडा एक कोटीवर गेला असून कोरोनाने देशातील तब्बल दीड लाख लोकांचा बळी घेतला आहे. देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (20 मार्च) देशात 24 तासांत कोरोनाचे 40,953 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 188 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,15,55,284 वर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा तब्बल 1,59,558 वर पोहोचला आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1,11,07,332 हून अधिक झाली आहे. देशात तब्बल 112 दिवसांनी जवळपास 41 हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे.
धोका वाढला! महाराष्ट्रातून येणाऱ्या बसेसना 'या' राज्यात बंदी, कोरोनामुळे सरकारने घेतला मोठा निर्णय
मुंबई आणि महाराष्ट्राची आकडेवारी आता चिंता वाढवणारी ठरत आहे. त्यामुळे मुंबई आता पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे हे संकेत आहेत. याच दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसवर 20 मार्चपासून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशात गुरुवारी कोरोनाचे 917 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या आकड्यानंतर राज्यात एकूण कोरोनारुग्णांची संख्या 2 लाख 71 हजार 957 झाली आहे. मध्य प्रदेशात सध्या 6 हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. अनेकांवर उपचार सुरू आहेत. मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीत 20 मार्चपासून महाराष्ट्रातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लोक आपल्या खासगी वाहनानं येऊ-जाऊ शकतात.
परिस्थिती गंभीर! 'या' राज्यात अनिश्चित काळापर्यंत 'नाईट कर्फ्यू' लागू, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
देशातील अनेक राज्यांमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान आता पंजाबमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना संक्रमणाचा वाढता वेग लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी संपूर्ण राज्यात अनिश्चित काळापर्यंत 'नाईट कर्फ्यू' लावण्याची घोषणा केली आहे. हा नाईट कर्फ्यू 9 ते 5 पर्यंत लागू राहील. नाईट कर्फ्यू परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत सुरूच राहील असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पंजाबमध्ये 1 ते 17 मार्च दरम्यान कोरोना रुग्णांच्या संख्येत चौपट वाढ झालेली दिसून येत आहे. 1 मार्च रोजी पंजाबमध्ये 500 नवीन रुग्ण आढळले होते तर 17 मार्च रोजी समोर आलेल्या रुग्णांची संख्या तब्बल 2045 वर पोहचली. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या आकड्यातही मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या एका महिन्यात जवळपास 392 जणांना आपला जीव गमवावा लागला आहेत. कोरोना रुग्णसंख्या रेकॉर्ड करताना दिसत आहे.