नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल तीन कोटींच्या पुढे गेली असून लाखो लोकांना यामुळे जीव गमावला आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होत आहे.
गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 70,496 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 964 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 69,06,152 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1,06,490 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी (9 ऑक्टोबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 70 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 69 लाखांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाखांवर पोहोचला आहे.
दिलासादायक! देशात तब्बल 59,06,070 जणांनी केली कोरोनावर मात
भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 8,93,592 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 59,06,070 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असतानाच आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे सातत्याने वाढत असून अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तसेच मृत्यूदरही कमी होत आहे.
कोरोनाच्या संकटात मॉडर्ना कंपनीची मोठी घोषणा, लसीसंदर्भात घेतला महत्त्वाचा निर्णय
अमेरिकेतील मॉडर्ना (Moderna) कंपनीने कोरोना लसीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकन औषधनिर्माण करणाऱ्या या कंपनीने गुरुवारी प्रेसनोट जारी केली आहे. यामध्ये लसीसंदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे तर औषध कंपन्याना मोठा फायदा होऊ शकेल असं म्हटलं जात आहे. मॉडर्ना कंपनी कोरोना व्हायरसच्या लसीच्या चाचणीवर काम करत आहे. तसेच चाचण्यांचा रिझल्ट देखील उत्तम येत आहे. कोरोना लसीचं पेटंट करण्यासाठी कंपनीकडून इतर कंपन्यांवर कोरोनाच्या काळात दबाव आणणार नाही असं कंपनीने आता म्हटलं आहे. आपल्या प्रेसनोटमध्ये याबाबतची माहिती दिली आहे.
"लसीमुळे वृद्धांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचं निरीक्षण"
कोरोना साथीच्या काळात हा महामारीशी लढा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. जगभरात कोरोना लसीवर काम सुरू असून ठिकठिकाणी संशोधन करण्यात येत आहे. संशोधनातून सातत्याने महत्त्वाची माहिती समोर येत आहे. US नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्टीव्ह डिसिसीज आणि अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्ना यांनी मिळून कोरोनावर लस तयार केली आहे. ही लस सध्या पहिल्याच टप्प्यातील चाचणी करत आहे. या लसीमुळे वृद्धांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचं निरीक्षणात दिसून आलं आहे.