नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनापुढे प्रगत देशही हतबल झाले आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्ताची संख्या ही तब्बल चार कोटींच्या वर गेली आहे. तर लाखो लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशातही कोरोनाचा धोका पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांचा आकडा 85 लाखांवर गेला असून कोरोनाने देशातील तब्बल 1 लाख लोकांचा बळी घेतला आहे.
रविवारी (8 नोव्हेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 45,674 नवे रुग्ण आढळून आले होते. तर 559 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 85,07,754 वर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा हा तब्बल 1,26,121 वर पोहोचला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी आहे.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 78 लाखांपेक्षा जास्त
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 78 लाखांपेक्षा अधिक झाली असून, त्यांचे प्रमाण 92.41 टक्के आहे. उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सलग दहाव्या दिवशी सहा लाखांपेक्षा कमी होती. देशातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच अनेकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या एक कोटीहून अधिक झाली आहे. युरोपमध्ये कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेमुळे तेथील स्थिती आणखी बिकट झाली आहे.
पहिल्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस; प्राधान्य गटांची निश्चिती करणार
देशामध्ये कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना ती देण्यात येईल. त्यामध्ये डॉक्टर, एमबीबीएसचे विद्यार्थी यांचाही समावेश असेल. भारत बायोटेक व आयसीएमआरच्या संयुक्त संशोधनातून विकसित होत असलेली कोव्हॅक्सिन लस येत्या फेब्रुवारीत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीचे वितरण तसेच लसीकरणाच्या विविध टप्प्यांत ती कोणत्या गटांतील लोकांना प्राधान्याने द्यावी याबद्दलचे धोरण केंद्र सरकार आखत आहे. असे प्राधान्य गट राज्यांनीही कळवावेत, असे आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले होते.