नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पुढे गेला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या अतिशय झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची चिंता वाढली आहे. त्यातच आता लॅन्सेट ग्लोबल हेल्थच्या अहवालामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. लॅन्सेटच्या अहवालानुसार, भारतातील ९८ टक्के भाग कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. देशातील ६४० जिल्ह्यांपैकी ६२७ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याची आकडेवारी लॅन्सेटनं प्रसिद्ध केली आहे. अमेरिकेनंतर भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय वेगानं वाढत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.भारतातील कोरोनाचा फैलाव नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा स्तरावर योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी आवश्यक असल्याचं लॅन्सेटनं अहवालात म्हटलं आहे. 'कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या भागांवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या भागांमध्ये योजनाबद्ध पद्धतीनं काम करण्याची गरज आहे. कोरोनाचा फैलाव वाढलेल्या भागांत लॉकडाऊन किंवा अन्य निर्बंध लागू करणं आवश्यक आहे,' असं लॅन्सेटनं अहवालात नमूद केलं आहे.भारत सरकारनं दिलेल्या आकडेवारीच्या आधारे लॅन्सेटनं अहवाल तयार केला आहे. जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या, तिथली लोकसंख्या आणि आरोग्य सुविधांच्या मदतीनं अहवाल तयार करण्यात आला आहे. अहवालातील माहितीनुसार देशातल्या नऊ राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. यामध्ये मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा, झारखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओदिशा आणि गुजरात यांचा समावेश आहे. ईशान्य भारतामधील स्थिती सध्या तरी चांगली आहे. सामाजिक, आर्थिक, स्वच्छता, आरोग्य सुविधा असे विविध निकष लक्षात घेऊन लॅन्सेटनं भारतातील कोरोना स्थितीचा अहवाल तयार केला आहे. भारताच्या ९ राज्यांमधील परिस्थिती अतिशय गंभीर असून त्यासंदर्भात तातडीनं पावलं उचलण्याची गरज लॅन्सेटनं व्यक्त केली आहे. अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा धोक्याचा इशारा लॅन्सेटनं दिला आहे.
CoronaVirus News: धोका वाढला! देशातील ६४० पैकी 'इतक्या' जिल्ह्यांना कोरोनाचा विळखा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 4:47 PM