नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 2,95,10,410 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 70,421 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3921 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,74,305 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली आहेत. काही ठिकाणी आरोग्य व्यवस्थेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांकडे आता मृतांची तब्येत कशी आहे याची चौकशी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
कोरोनाग्रस्तांना फोन करुन त्यांच्या आरोग्यासंदर्भात विचारपूस करणाऱ्या यंत्रणेची पोलखोल करणारे काही धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. दोन महिन्यापूर्वी करोना पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण बरे झालेत की त्यांचा मृत्यू झालाय याचा तपास आरोग्य यंत्रणेमार्फत आता फोनवरुन केला जात आहे. या सर्व गोंधळामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलेले नातेवाईक नाराज झाले आहेत. काही जण कॉलला प्रतिसाद देत नाहीत. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदार वागणुकीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना आरोग्य विभागाकडून फोन केले जात आहेत. फोनवरुनच कोरोना रुग्णाच्या आरोग्याची चौकशी केली जात आहे. गोमतीनगर येथील रहिवाशी आणि बलरामपूर रुग्णालयाचे माजी आरोग्य अधीक्षक डॉ. डी. पी. मिश्रा यांची पत्नी कुमुद मिश्रा यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. 27 एप्रिल रोजी उपचारादरम्यान कुमुद यांचं निधन झालं. कोविन पोर्टलवर कुमुद यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती अपलोड करुन दीड महिना झाल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली. कुमुद यांच्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाने नुकताच डॉ. डी. पी. मिश्रा यांना फोन केला होता.
आशियाना येथे राहणाऱ्या सरिता द्विवेदी यांना एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल कोविन पोर्टलवर अपलोड करण्यात आला होता. मागील आठवड्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी फोनवरुन सरिता यांच्या आरोग्यासंदर्भातील माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सरिता यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. अशी दोनच प्रकरणं नाहीत तर अनेक अशा रुग्णांना सध्या फोन करुन त्यांच्या आरोग्याची चौकशी केली जात आहेत जे महिन्याभरापूर्वीच कोरोनामुक्त होऊन रुग्णालयांमधून घरी परतले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.