भीलवाडा - कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 5,28,859 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 16,095 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. तर काही ठिकाणी विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जात आहे. मात्र कोरोनाच्या काळात लग्न करणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. तब्बल सहा लाखांचा फटका बसला आहे.
राजस्थानमधील भिलवाडामध्ये ही घटना घडली आहे. मुलाच्या लग्नसोहळ्यासाठी एका वडिलांना 6,26,600 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील एका घरात 13 जून रोजी विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नासाठी तब्बल 50 हून अधिक लोकांना आमंत्रित केले होते. लग्न समारंभासाठी काही नियम ठरवून देण्यात आले आहेत. मात्र या लग्नात नियमांचं योग्य रित्या पालन करण्यात आले नाही.
समारंभात 50 हून अधिक लोकांनी हजेरी लावली होती. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला यामुळेच लग्न समारंभात हजेरी लावल्यानंतर येथील 15 लोकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच एका व्यक्तीचा कोरोना संसर्गामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. भिलवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला याबाबत तब्बल 6 लाख 26 हजार 600 रुपयांचा दंड ठोठावला आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधून वेगाने जगभरात पसरलेल्या कोरोनाचा फटका जवळपास सर्वच देशांना बसला आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ही आता तब्बल 1 कोटीच्या पुढे गेली असून 5 लाखांहून अधिक जणांनी यामुळे जीव गमावला आहे. रविवारी (28 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 19,906 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पाच लाख 28 हजारांवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा सोळा हजारांवर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णसंख्येत विक्रमी वाढ, चिंता वाढवणारी आकडेवारी
CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशाचा रिकव्हरी रेट 58%, जवळपास 3 लाख लोकांनी केली कोरोनावर मात
Google Pay चा वापर करणं धोकादायक, खरंच RBI ने घातली बंदी?; जाणून घ्या नेमकं काय आहे 'हे' प्रकरण
CoronaVirus News : राज ठाकरेंच्या 'कृष्णकुंज'मध्ये कोरोनाचा शिरकाव; घरकाम करणाऱ्या दोघांना लागण
Coronil : कोरोनिल वादाच्या भोवऱ्यात; बाबा रामदेव यांच्यासह 5 जणांविरोधात FIR दाखल
घरबसल्या अपडेट करा रेशन कार्ड, नोंदवा कुटुंबातील सदस्याचं 'नाव'; जाणून घ्या कसं