लखनौ - देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा सातत्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात 17 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशमधून मोलमजुरीसाठी परराज्यात गेलेल्या मजुरांचे प्रमाण लक्षणीय आहे. दरम्यान, परराज्यात अडकलेल्या या मजुरांसाठी उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कामधंद्यानिमित्त बाहेर गेलेल्या आणि लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या मजुरांना टप्प्याटप्प्याने राज्यात परत नेण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. आतापर्यंत 6 लाख मजूर उत्तर प्रदेशमध्ये परतल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.
योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी (5 मे) राज्यात जवळपास 6 लाख मजूर परतल्याचा दावा केला आहे. तसेच सर्व मजुरांपर्यंत 1000 रुपयांचा राज्य सरकारद्वारे देण्यात येणारा पालन-पोषण भत्ताही पोहचल्याचं म्हटलं आहे. इतर प्रदेशांतून जवळपास 6.5 लाख मजुरांना राज्यात परत आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. परतलेल्या सर्व मजुरांना होम क्वारंटाईन करण्यासाठी त्यांच्या घरी पाठवण्यात आलं आहे. घरी परतणाऱ्या या मजुरांना सरकारकडून नि:शुल्क खाद्य आणि 1000 रुपये मदतनिधी देण्यात आला असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये 88 लाखांहून अधिक पेन्शन धारकांना दोन महिन्यांची आगावू रक्कम उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील 2 कोटी 34 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2-2 हजार रुपयांचा पहिला हप्ता एप्रिल महिन्यात तर दुसरा या महिन्यात पाठवण्यात येणार आहे. 3 कोटी 26 लाख महिलांच्या जन धन खात्यात 1630 कोटी रुपये एप्रिलमध्ये आणि 1630 कोटी रुपये मे महिन्यात पाठवण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी जनतेला या कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरं जाण्याचं आणि संवेदनशीलता कायम ठेवण्याचं आवाहन केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 2,52,675 जणांचा मृत्यू; अमेरिकेत परिस्थिती गंभीर
CoronaVirus News : "...हे तर आमच्याकडून देशासाठी केलेलं दान", मद्यप्रेमीचा 'हा' Video व्हायरल
CoronaVirus News : खोकल्याचं औषध घेत असाल तर वेळीच व्हा सावध, वाढू शकतो कोरोनाचा धोका?