CoronaVirus News: पीएम केअर्सचं ऑडिट गरजेचं; राहुल गांधीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 01:56 PM2020-05-08T13:56:08+5:302020-05-08T14:00:04+5:30
CoronaVirus marathi News: पॅकेजची घोषणा करायला मोदी सरकार घाबरतंय; राहुल गांधींचा निशाणा
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधींनी आज कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मोदी सरकारनं जनतेपर्यंत आर्थिक मदत पोहोचवण्याची गरज आहे. मात्र सरकार आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यास घाबरत आहे. सरकार जोखीम पत्करण्यास तयार नाही. मात्र ही वेळ जोखीम घेण्याचीच आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
आर्थिक पॅकेजची घोषणा केल्यास, पैसा खर्च केल्यास रुपयाची अवस्था गंभीर होईल, अशी भीती मोदी सरकारला वाटते. मात्र सरकारला आता जोखीम स्वीकारावी लागेल. कारण शेवटच्या घटकापर्यंत पैसा पोहोचायला हवा. सरकार जितका जास्त वेळ विचार करेल, तितका आपला वेळ वाया जाईल, असं राहुल गांधींनी म्हटलं.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या पीएम केअर्सचं ऑडिट होण्याची गरज असल्याचं राहुल गांधी म्हणाले. 'पीएम केअर्सचं ऑडिट आवश्यक आहे. पीएम केअर्समधला किती पैसा खर्च झाला आणि त्यात किती पैसा यायला हवा, हे जनतेला कळायला हवं,' असं राहुल गांधींनी म्हटलं. पीएम केअर्समध्ये जमा होणारा निधी, त्याचा खर्च याबद्दल पारदर्शकता गरजेची असल्याचं ते म्हणाले.
लोकांच्या मनात कोरोनाबद्दल भीती आहे आणि ती भीती दूर करण्यात सरकार अपयशी ठरत आहे, अशा शब्दांत राहुल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. लॉकडाऊन नेमका कधीपर्यंत चालणार, हे सरकारनं स्पष्टपणे सांगायला हवं. कोरोना संकट केवळ एक टक्के जनतेसाठी धोकादायक आहे. मात्र ९९ टक्के लोकांच्या मनात त्याची भीती आहे. ही भीती सरकारनं दूर करण्याची गरज असल्याचं राहुल म्हणाले.