नवी दिल्ली: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी हिमाचल प्रदेश मॉडेलचा विचार करावा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना केली आहे. हिमाचल प्रदेश सरकारनं राज्यातल्या सर्व जनतेची तपासणी केली. शरीरात शीतज्वराची लक्षणं असल्यास त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. यानंतरही प्रकृतीत सुधारणा न झालेल्या व्यक्तींची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. याच मॉडेलचा वापर करण्याची सूचना मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांना केल्याचं वृत्त 'द इकॉनॉमिक टाईम्स'नं दिलं आहे.सर्व राज्यांनी रेड आणि ऑरेंज झोनमध्ये हिमाचल मॉडेल राबवावं, घरोघरी जाऊन नागरिकांचं स्क्रीनिंग करावं, जास्तीत जास्त लोकांनी कोरोनाशी संबंधित लक्षणं आरोग्य सेतू ऍपच्या माध्यमातून स्वत: सांगावीत यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं, अशा सूचना केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. हिमाचल प्रदेशची लोकसंख्या ७० लाख असून राज्यातल्या सगळ्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. शरीरात इन्फ्लुएंझा सदृश्य लक्षणं आढळतात का, यासाठी हिमाचल प्रदेश सरकारनं मोठ्या प्रमाणात तपासण्या केल्या.सोळा हजार अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन राज्यातल्या जनतेच्या तपासण्या केल्याची माहिती हिमाचल प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) आर. डी. धिमन यांनी दिली. या दरम्यान १० हजार जणांमध्ये इन्फ्लुएंझा सदृश्य लक्षणं आढळून आली. यापैकी दीड हजार जणांची प्रकृती औषधोपचारांनंतरही सुधारली नाही. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. हिमाचल सरकारनं दर १० लाख लोकांमागे ७०० जणांच्या चाचण्या घेतल्या. सर्वाधिक कोरोना चाचण्या घेणाऱ्या (दर दहा लाखांमागील) राज्यांच्या यादीत हिमाचल पुढे आहे.
CoronaVirus News: रेड, ऑरेंज झोनसाठी आता 'हिमाचल मॉडेल'; मोदींच्या सर्व राज्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 9:04 AM