नवी दिल्ली - भारत आणि चीनमधील वाढता तणाव पाहता अत्यंत महत्वपूर्ण असलेलं अटल टनल रोहतांग येथे बनून तयार झालं आहे. बीआरओकडून सध्या या टनलच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन ऑक्टोबरला कुल्लू येथे पोहोचणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. 10 हजार फुट लांब असलेला जगातील सर्वात लांब रोड टनल अखेर भारतात तयार झाला आहे. मात्र पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी 17 अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमाच्या तयारीसाठी आलेल्या विविध विभागांच्या 17 अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या पॉझिटिव्ह अधिकाऱ्यांमध्ये 3 पोलीस कर्मचारी, 1 CID चे अधिकारी, 2 पर्यटन विभागाचे कर्मचारी, विविध सरकारी विभागांचे 11 ड्रायव्हर्स यांचा समावेश आहे. कोविड प्रोटोकॉलनुसार या कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यानंतरच त्यांना कार्यक्रमाच्या तयारीची परवानगी दिली जाणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जगातील सर्वात लांब बोगद्याचं पंतप्रधान करणार उद्घाटन
टनेल तयार करण्यासाठी दहा वर्षांचा कालावधी लागला आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावावरून या बोगद्याचे नाव ठेवलं आहे. ज्याची लांबी 8.8 किलोमीटर इतकी आहे. 10,171 फुटांवर अटल रोहतांग टनल तयार करण्यात आलं आहे. या टनलमुळे मनाली ते लेह हे अंतर 46 किलोमीटरने कमी झाले आहे. या टनलमुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे लाहौल स्पितीसारखा जो भाग देशापासून सहा महिने संपर्कात नसतो तोच भाग आता बाराही महिने संपर्कात राहणं शक्य होणार आहे.
मोदींच्या दौऱ्याआधी 17 अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह
समुद्रसपाटीपासून जवळपास 12 हजार फुटांच्या उंचीवर साकारण्यात येणारा हा बोगदा जगातील सर्वात मोठा ट्रॅफिक टनल मानला जात आहे. मात्र मोदींच्या दौऱ्याआधी 17 अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. कुल्लूमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 646 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 63,12,585 वर गेला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 86,821 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,181 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 98,678 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.