नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यामध्ये रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असणार आहे. तर ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात दारुची दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. लॉकडाऊन-3 मध्ये सरकारने दारुची दुकाने उघडण्यासाठी काही अटी घातल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. मात्र अनेक ठिकाणी दारू पायी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दारुची दुकाने उघडणार असल्याने मद्यप्रेमींनी सोमवारी (4 मे) सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावल्या आहेत. दुकाने उघडणार म्हणून तळीरामांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र याच दरम्यान दारू खरेदीसाठी अनेक ठिकाणी लोकांनी प्रचंड गर्दी केली आहे. तळीरामांना सोशल डिस्टसिंगचाही विसर पडला आहे. अशातच लोकांना थांबवण्यासाठी शेवटी पोलिसांना यावं लागत आहे. दिल्लीतही सोमवारी एका वाईन शॉपसमोर लोकांनी गर्दी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये दारू खरेदीसाठी लोक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने सोशल डिस्टंसिंगचे पालन केले गेले नाही. शेवटी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस आले आणि त्यांनी तळीरामांवर सौम्य लाठीचार्ज केला. वाईन शॉपसमोरील या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तसेच कर्नाटकातील हुबळीमध्ये देखील एका दारुच्या दुकानाबाहेर सकाळी सात वाजताच लोकांनी रांगा लावल्या होत्या.
काही ठिकाणी प्रत्येक जण मास्क लावून किंवा चेहरा झाकून दारू खरेदीसाठी येत आहेत. दरम्यान, काही ठिकाणी दारुच्या दुकानासमोर सोशल डिस्टंसिंगसाठी आखण्यात आलेल्या सर्कलवर लोक उभे असल्याचे दिसून येत आहेत. याचबरोबर, अनेक दारुच्या दुकानांबाहेर पोलीस सुद्धा तैनात आहेत. गर्दीमुळे कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढू नये, यासाठी दारुच्या दुकानांबाहेर सोशल डिस्टंसिंगचे पालन लोकांकडून होत आहे की, नाही यावर पोलीस नजर ठेवून आहेत.