नवी दिल्ली - कोरोनाने जगाला विळखा घातला असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 59,000 वर पोहोचला आहे. तर 1800 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील लोक कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी अहोरात्र काम करत आहेत. तसेच डॉक्टरही आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान काही आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक असल्याची माहिती समोर येत आहे.
मधुमेह, श्वसनसंबंधी आजार किंवा हृदयासंबंधी आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना व्हायरसचा धोका हा अधिक असतो. मात्र नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार जर कॅन्सर रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाली तर त्यांच्या मृत्यूचा धोका हा तीन पटीने वाढत असल्याची माहिती मिळत आहे. चीन, सिंगापूर आणि अमेरिकेतील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला आहे. यामध्ये जर एखाद्या रुग्णाला ब्लड कॅन्सर (Blood Cancer) आणि फुफ्फुसाचा कॅन्सर (Lungs Cancer) असेल तर त्या कोरोना रुग्णाला मृत्यूचा धोका जास्त असल्याचं संशोधकांना दिसून आलं आहे. या तुलनेत उत्तम आरोग्य असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी आहे.
चीनच्या हुबेई प्रांतातील कोरोना रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये समान वयाच्या 105 कॅन्सर रुग्णांचा समावेश होता, याशिवाय 536 रुग्ण होते ज्यांना कॅन्सर नव्हता. सामान्य कोरोनाग्रस्तांचा मृत्यू 2 ते 3 टक्के आहे. तर कॅन्सरग्रस्त कोरोना रुग्णांच्या मृत्यूदर तीन पट जास्त आहे. कॅन्सर रुग्ण कोरोना व्हायरसच्या विळख्यात येण्याची आणि गंभीर होण्याची शक्यताही जास्त असते अशी माहिती संशोधकांनी दिली आहे. तसेच त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यास त्यांना आयसीयूमध्ये ठेवले जाते.
अमेरिकेत 218 कॅन्सर रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. हे रुग्ण 18 मार्च ते 8 एप्रिल दरम्यान कोरोना संक्रमित झाले होते. त्यापैकी 61 कॅन्सर रुग्णांचा संक्रमणामुळे मृत्यू झाला. सामान्य कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण 5.8 टक्के होतं, तर कॅन्सरग्रस्त कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण 28 टक्के असल्याची माहिती संशोधनातून पुढे आली आहे. फुफ्फुस कॅन्सर असलेल्या रुग्णांचा कोरोनामुळे होणारा मृत्यूदर सर्वात जास्त म्हणजे 55 टक्के आहे. तर त्यानंतर पोटाचा कॅन्सर असलेल्या रुग्णांचा 38 टक्के, ब्लड कॅन्सर रुग्णांचा 37 टक्के, प्रोस्ट्रेट कॅन्सर रुग्णांचा 20 टक्के आणि स्तन कॅन्सर रुग्णांचा 14 टक्के मृत्यूदर आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.