नवी दिल्ली - कोरोनाविरोधात देशवासीयांचा लढा सुरू असला तरी गेल्या आठ दिवसांत रुग्णसंख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. लॉकडाउन, फिजिकल डिस्टन्सिंग, घराबाहेर पडताना मास्क, सॅनिटायझरचा वापर, वारंवार हात धुण्याची सवय लोकांनी अंगीकारली असली तरी या काळात कोरोनाने विळखा घट्ट केला आहे. तिसऱ्या लॉकडाउनचा शेवटचा आठवडा सुरू होताना देशातील रुग्णसंख्या 60 हजारांच्या वर पोहोचली. दररोज सरासरी तीन हजारांपेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद होत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.
देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे एकूण 3277 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 127 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 62939 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 2109 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रविवारी (10 मे) आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 3277 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 62 हजारांच्या वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2100 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 41472 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 19358 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. जगात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आतापर्यंत 40 लाखांवर गेल्याने सर्वच देशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत या भयावह आजाराने 2 लाख 78 हजार 800 जणांचा बळी घेतला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सर्वाधिक आहे. शनिवारी 20 हजारांवर राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे कोरोना रुग्णांची ही संख्या एकूण कोरोनाग्रस्तांच्या संख्येच्या 33% आहे. महाराष्ट्रात सतत वाढणाऱ्या या प्रकरणांमुळे केंद्र सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. देशातील 15 जिल्ह्यांमध्ये 64% प्रकरणे आहेत. यातील दिल्ली, पुणे, मुंबई, अहमदाबाद आणि चेन्नई येथील जिल्ह्यांमध्ये 50% कोरोना प्रकरणे आहेत. सध्या या 5 शहरांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. देशभरात कोरोनामुळे आतापर्यंत 1800 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर महाराष्ट्रात 779 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 1165 नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 20 हजार 228 इतका झाला आहे. दिवसभरात 330 रुग्ण बरे झाले असून, राज्यात आतापर्यंत तब्बल 3800 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : धोका वाढला! महाराष्ट्राने वाढवली सरकारची चिंता
CoronaVirus News : त्यांचा तो प्रवास ठरला अखेरचा! लॉकडाऊनमध्ये भीषण अपघात; 5 जणांचा मृत्यू, 11 जखमी
CoronaVirus News : 'हा' आजार असलेल्या कोरोनाग्रस्तांना मृत्यूचा तिप्पट धोका
coronavirus: कोरोनाचा उद्रेक! जगभरात ४०.७२ लाख; देशात ६२ हजार, तर राज्यात २० हजार रुग्ण