वॉशिंग्टन : कोरोना संकटावर मात करण्यासाठी भारत आणि अमेरिका खांद्याला खांदा लावून काम करत आहे. यासाठी आपसातील समन्वय आणि माहितीचे आदान-प्रदान यावर अधिक भर दिला जात आहे. अमेरिकेतील भारतीय राजदूत टी. एस. संधू म्हणाले, दोन्ही देशांच्या कंपन्या सध्या किमान तीन व्हॅक्सीनवर खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. एवढेच नाही, तर इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ही भारतीय संस्था अमेरिकन संस्थेसोबत नेहमीच सहकार्य करतच आली आहे.
संधू हे एएनआय वृत्त संस्थेशी बोलताना म्हणाले, 'आयसीएमआर आणि अमेरिकेतील सीडीसी-एनआयएच अनेक वर्षांपासून एकमेकांना सहकार्य करत आहेत. तीन वर्षांपूर्वी दोघांनी मिळून रोटाव्हायरसवर व्हॅक्सीन तयार केली होती. ही व्हॅक्सीन केवळ भारतच नाही तर अमेरिकेसह अनेक देशांसाठी उपयुक्त ठरली होती.'
भारत आणि अमेरिका यावेळीही सोबतीने काम करत आहेत. 'भारत आणि अमेरिकेतील कंपन्या किमान तीन व्हॅक्सीनवर काम करत आहेत. याशिवाय आपण सप्लाय चेनचाही एक मोठा भाग आहोत आणि या संकटाच्या काळात आपण अमेरिकेलाही दाखवून दिले आहे, की भारत एक विश्वसनीय साथीदार आहे,' असेही संधू म्हणाले.
आणखी वाचा - 40 कुटुंबांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश; पूर्वजांना औरंगजेबाने मुस्लीम बनवल्याचा दावा
यापूर्वी भारताने आवश्यक असलेल्या औषधावरील निर्बंध हटवून ते अमेरिकेला निर्यात केले होती. भारत हा हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन मेडिसिनचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. ट्रम्प यांच्या आवाहनानंतर भारताने या औषधावरील निर्बंध हटवले होते. ही एक अँटी-मलेरिया मेडिसिन आहे. या औषधाचा वापर सध्या कोरोनाबाधितांवरील उपचारात केला जात आहे. भारताने अमेरिकेसह अनेक देशांना हे औषध पाठवले आहे.