नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,03,95,278 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 20,346 नवे रुग्ण आढळून आले असून 222 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,50,336 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान दिलासादायक माहिती समोर आली आहे. कोरोनाबाबतची सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या संख्येने तब्बल एक कोटींचा टप्पा पार केला आहे. देशातील एक कोटींहून अधिक लोकांनी उपचारानंतर कोरोनाची लढाई जिंकली आहे.
कोरोनाच्या रिकव्हरी रेटमध्ये भारत जगात भारी असून देशाचा रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या भारतातील रुग्णांचं प्रमाण जगात सर्वाधिक असून भारताचा रिकव्हरी रेट 96.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्याच्या अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 44 पटींनी जास्त आहे. सध्या देशात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण 2,28,083 इतके आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांतून एकूण 51 टक्के बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण आहे. कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोनाचा मृत्युदर 1.45 टक्के आहे. 6 जानेवारी 2021 पर्यंत संपूर्ण देशभरातून 17 कोटी 84 लाख 995 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. दरम्यान, ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 71 वर पोहोचली आहे. यापूर्वी 58 जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याचे समोर आले होते. बुधवारी यात नव्या 13 रुग्णांची भर पडून एकूण आकडा 71 झाला आहे. या सर्वांना सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, मास्क, होम आयसोलेशन यासारखे खबरदारीचे उपाय केले जात आहेत.
भय इथले संपत नाही! 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेन
देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. देशभरातील कोरोना संसर्गाचा वेग थोडा मंदावत असतानाच ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोनामुळे चिंता वाढली आहे. कोरोना व्हायरसच्या या नवीन प्रकाराने आता जगभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये ब्रिटनहून परतलेल्या एका कुटुंबातील सदस्यांमध्ये कोरोना व्हायरसचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कुटुंबातील 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये देखील कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ब्रिटनहून एक कुटुंब उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये परतलं आहे. कुटुंबातील सदस्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याचे नमुने दिल्लीला तपासणीसाठी देण्यात आले. यामध्ये 4 जणांच्या कुटुंबातील 2 वर्षीय चिमुकलीला नव्या कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.