नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 61,45,292 वर गेला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 96,318 लोकांना जीव गमवावा लागला आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 70,589 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 776 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र याच दरम्यान सातत्याने चिंताजनक आकडेवारी समोर येत आहे.
कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून येत्या काही दिवसांत कोरोनाचा धोका कायम असल्याची माहिती आता समोर आली आहे. सध्या सण-समारंभाचे दिवस आहेत. त्यामुळे या काळात मास्क घालूनच सर्व सण साजरे करावेत असा सल्ला केंद्र सरकारने नागरिकांना दिला आहे. नीती आयोगाचे सदस्य आणि भारताच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी "कोरोनाचा अधिक संसर्ग होऊ नये, यासाठी पुढील काही महिन्यांत आपल्याला मास्कवाली पूजा, मास्कवाली छटपूजा, मास्कवाली दिवाळी, मास्कवाला दसरा, मास्कवाली ईद साजरी करावी लागेल" असं म्हटलं आहे.
केंद्र सरकारने दिला मोलाचा सल्ला
सण-समारंभ असल्याने लोक एकमेकांना भेटण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे अशा वेळी मास्क लावण्याचा आणि योग्य ती काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. इंडियन काऊन्सिल मेडिकल रिसर्चने (ICMR) दुसरा राष्ट्रीय सीरो सर्व्हे जारी केला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 17 ऑगस्ट ते 22 सप्टेंबरदरम्यान हे सीरो सर्व्हेक्षण करण्यात आलं. यामध्ये 10 वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचा प्रसार 6.6 टक्के झाल्याची माहिती समोर आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
आनंदाची बातमी! कोरोनाची लढाई जिंकताहेत मुंबईकर, 'ही' आकडेवारी सुखावणारी
महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल 35 हजारांवर पोहोचला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. तर तब्बल 10 लाख लोकांनी कोरोनावर मात केली आहे. 10,49,947 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा कहर असताना मुंबईतून एक दिलासादायक माहिती आता समोर आली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईतून सुखावणारी माहिती मिळत आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून मुंबईकर कोरोनाची लढाई जिंकत आहेत. दिलासादायक म्हणजे मुंबईचा रिकव्हरी रेट हा 82 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. गेल्या दहा दिवसांत 27,219 अधिक लोक हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर सप्टेंबरमध्ये 47,615 लोकांनी कोरोनाविरुद्धचं युद्ध जिंकलं आहे. कोरोनाच्या लढ्याला यश येत आहे.