कानपूर - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल तीन लाखांवर पोहोचली आहे. तर 9 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊनमध्ये ट्रेन आणि विमानसेवा बंद होती. मात्र आता हळूहळू विमान प्रवास सुरू झाला आहे. दिल्ली ते कानपूर आणि कानपूर ते दिल्ली ही विमानसेवा देखील सुरू करण्यात आली आहे. कानपूरमधील अहिरवा विमानतळावर जाणाऱ्या-येणाऱ्यांचे थर्मल स्क्रिनिंग देखील होत आहे. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरच्या अहिरवा विमानतळावर आलेल्या एका तरुणीमुळे अनेकांचा जीव धोक्यात आला आहे. 10 जून रोजी एक तरुणी दिल्लीहून अहिरवा विमानतळावर पोहोचली आणि तिच्यामध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे आढळून आल्यामुळे तिला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच या तरुणीची 3 दिवसांनी कोरोना चाचणी केल्यानंतर ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. एअरपोर्ट ऑथोरिटी स्टाफ आणि अन्य प्रवाशांना ही सूचना मिळताच त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिल्लीमधील विमानाने कानपूरमध्ये पोहोचलेली ही तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने विमानतळ प्रशासन धास्तावले आहे. विमानतळ प्रशासनाने सर्व प्रवासी, स्टाफ आणि सीआयएसएफ जवानांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानतळ प्रशासनाने जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रवाशांची यादी दिली आहे. दिल्लीहून 10 जून रोजी अहिरवा एअरपोर्टवर विमानातून 75 प्रवासी आले होते. यातील एका तरुणीमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने तिची तपासणी 13 जून रोजी करण्यात आली.
15 जून रोजी तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. विमानाने आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. विमानतळ संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, संक्रमित तरुणीशिवाय अन्य प्रवासी, 6 कर्मचारी आणि 16 सीआयएसएफ जवानांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यांची यादी जिल्हा अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
एकीकडे चीन तर दुसरीकडे कोरोना; मोदी सरकारसमोर आहेत 'ही' 5 मोठी आव्हानं
CoronaVirus News : कोरोनाचा धोका वाढतोय; आता देशात दररोज तब्बल 3 लाख लोकांची होणार चाचणी