चेन्नई : येथील कोयंबेडू होलसेल मार्केट लॉकडाऊनचे नियम न पाळणे आणि फिजिकल डिस्टन्सिंगची अजिबात तमा न बाळगल्याने आता कोरोना विषाणूच्या प्रसाराचा हॉटस्पॉट म्हणून पुढे आले आहे. येथील रुग्णांची वेगाने वाढणारी संख्या, हे सरकारपुढील मोठे आव्हान ठरले आहे.
देशात लॉकडाऊन जारी झाल्यापासून सगळीकडे नियमांचे कोटेकोर पालन आवश्यक होते; पण पहिल्याच दिवशी कोयंबेडूच्या मार्केटमध्ये खरेदी रोजच्याप्रमाणे सुरू होती. प्रशासनाच्या हे लक्षात आणून देताच मार्केट बंद केले. परंतु अशी कोणतीही सूचना नाही, असे सांगत मार्केट दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. स्पष्ट सूचना नसल्याने काही विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली; पण बहुतांश दुकाने सुरूच राहिल्याने ग्राहकांची गर्दी वाढतच गेली.
चेन्नई मेट्रोपोलिटन डेव्हलपमेंट अॅथॉरिटीलाही (सीएमडीए) या मार्केटमध्ये नियमांचे पालन व्हावे, याकडे नीट लक्ष पुरवता आले नाही. सीएमडीएकडे हे कसे करावे, याची नीटशी माहिती नव्हती तसेच त्यासाठी आवश्यक मनुष्यबळही नव्हते. या गोंधळाच्या स्थितीमुळे लाखो नागरिक येथे खरेदीसाठी येतच राहिले. पोलीस व स्थानिक प्रशासन या वेळी केवळ बघ्याच्या भूमिकेत दिसले.बहुतांश विक्रेते, कामगार बनले वाहक‘कोविड-१९’चा प्रसार रोखण्याची खबरदारी म्हणून राज्यातील अनेक मार्केट बंदिस्त जागेतून मोकळ्या जागेत वा मैदानात हलवण्यात आली. परंतु, कोयंबेडूचे मार्केट त्याच गजबजलेल्या बंदिस्त गल्लीत फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता सुरूच ठेवण्यात आले. मार्केटमधील बहुतांश विक्रेते तसेच कामगार या काळात कोरोनाचे वाहक बनले आहेत. अनेकांना याची बाधा झाली आहे. या लोकांपासून आता समूह संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.