नवी दिल्ली - देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे विमान प्रवास करणाऱ्यांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. विमानतळ आणि विमानातून प्रवास करताना मास्क घालणं बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने बुधवारी आदेश देत CISF जवानांना याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे जो प्रवासी कोरोनाच्या नियमावलीचे पालन करणार नाही त्याला टेक ऑफच्या आधी बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल.
DGCA नं म्हटलंय की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क लावणे बंधनकारक असेल. जर कुणी प्रवासी वारंवार सांगूनही नियमांचे पालन करणार नाही तर त्याला विमानातून खाली उतरण्यात येईल. त्यांच्यावर कोविड नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल. विमान प्राधिकरणाने कर्मचारी, सुरक्षा जवानांना सक्तीनं याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मास्क न घालणाऱ्या प्रवाशांवर दंडही आकारला जाऊ शकतो. तसेच संबंधित प्रवाशाला सुरक्षा जवानांच्या हाती देण्यात येईल असं सांगण्यात आले आहे.
यापूर्वी, दिल्ली उच्च न्यायालयाने विमानतळ आणि फ्लाईट्समध्ये कोविड प्रोटोकॉलचे कठोर पालन करण्याचे आदेश दिले होते. कार्यवाह मुख्य न्यायाधीश विपिन संघी यांच्या खंडपीठाने सांगितले की, विमानतळावर आणि विमानात मास्क न घालणाऱ्यांना मोठा दंड ठोठावण्यात यावा. नियमांचे पालन करावे, असे खंडपीठाने सांगितले. जर कोणी नियमांचे पालन केले नाही तर त्याला विमानतळावर किंवा विमानातून हाकलून द्यावे. विमान प्रवासादरम्यान कोविड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती, त्यानंतर न्यायालयाने नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) न्यायालयाला सांगितले की, विमानात अन्न खातानाच मास्क काढण्याची सूट देण्यात आली आहे.
DGCA नं मार्गदर्शक नियमावली जारी करण्याचे दिले होते आदेशन्यायालयाने म्हटलं होतं की, विमान कंपन्यांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. अशा परिस्थितीत डीजीसीएनेही स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत. ही मार्गदर्शक सूचना विमानतळ अधिकारी, विमानातील कर्मचारी, कॅप्टन, पायलट यांना पाठवावी. यामध्ये स्वच्छता आणि प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कडक कारवाई करण्यात यावी. अशा प्रवाशांना नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकावे. उड्डाणे आणि विमानतळांवरील कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्याला उत्तर देताना न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.