नवी दिल्ली : देशात कोरोनाची साथ वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने आता विमानतळावर व विमानांमध्ये प्रवासी व कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक केले. मास्क न घालणाऱ्या प्रवाशांना उड्डाणापूर्वी विमानातून खाली उतरविणे व त्यांना दंड ठोठावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासंदर्भात नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने बुधवारी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. दिल्ली हायकोर्टाने यासंदर्भात केंद्राला ३ जूनला आदेश दिला होता. डीजीसीएने सांगितले की, विमानतळावर प्रत्येकाने मास्क घातला की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सीआयएसएफ जवानांवर सोपविली आहे.
हवाई सुंदरी, पायलट यांनाही नियम लागूमास्क बंधनकारक असण्याचा नियम विमानतळावरील, तसेच विमानातील सर्व कर्मचारी, प्रवासी यांच्यासाठी लागू असेल, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्राला दिले होते. हा नियम पायलट, हवाई सुंदरी, फ्लाईट अटेंडंट यांनाही लागू आहे.