नवी दिल्ली : यापुढे रेल्वे स्थानकांवरील स्टॉलवर प्रवाशांच्या सोयीसाठी मास्क, ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर यांची विक्री करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. याशिवाय रेल्वे स्टॉलवर उशा, बेडरोल, टॉवेल, स्वच्छतागृहांतील वस्तू, औषधे, अन्य प्रसाधने आणि पाकीटबंद खाद्यपदार्थही विकले जाणार आहेत.प्रवासाला निघताना या वस्तू घेण्याचे विसरतात. कोरोनाच्या संसर्गाच्या काळात सर्व प्रवाशांकडे मास्क, सॅनिटायझर तसेच ग्लोव्ह्ज असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची तसेच काही औषधांची विक्री रेल्वे स्टॉलवर यापुढे केली जाईल. रेल्वे स्टॉलवर आतापर्यंत खाद्यपदार्थ मिळत असत. पण अनेक निर्बंधांमुळे ते बंद करण्यात आले आहे.आता मात्र पाकीटबंद खाद्यपदार्थही तिथे मिळतील आणि प्रवाशांचा मोठा प्रश्न सुटेल. कोरोना संसर्गामुळे रेल्वेच्या डब्यात उशा, टॉवेल, बेडरोल, नॅपकिन, ब्लँकेट देणे बंद झाले आहे. बऱ्याचदा प्रवाशांना याची माहिती नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रेल्वे स्टॉलवर या वस्तूही विकत मिळू शकतील. या सर्व वस्तू एक-एक वा एकत्रितपणे (किट) विकल्या जातील. सध्या काही मोठ्या स्थानकांवरील स्टॉलवर या वस्तू मिळतात. पण आता सर्वच रेल्वे स्थानकांवर त्या मिळू शकतील, असे सांगण्यात आले. रेल्वे स्टॉलवर विकल्या जाणा-या वस्तूंचा दर्जा चांगला असावा. खाद्यपदार्थही ताजे व चांगले असावेत, तसेच ते कधी तयार करण्यात आले आहेत आणि किती काळपर्यंत खाण्यास योग्य आहेत, याची माहिती त्या पाकिटांवर असणे बंधनकारक आहे.कोरोना संकटाच्या काळात प्रवाशांना प्रवासादरम्यान काही विशिष्ट वस्तूंची गरज भासू शकते. काहीवेळा अशा वस्तू प्रवासी घरातच विसरतात. त्या दृष्टीनं रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्सवर मास्क, सॅनिटायझर तसेच ग्लोव्ह्ज विक्रीस ठेवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. या वस्तू एमआरपीनुसार विकल्या जातील आणि त्यात कोणतीही नफेखोरी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. (फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचे कुठलेही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.)