नवी दिल्ली - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेले लाखो मजूर आपल्या गावांच्या दिशेने पलायन करत आहेत. यापैकी अनेक जण चालत गावाच्या दिशेने निघाले आहेत, तर काहीजण उतार प्रदेश सरकारने सोय केलेल्या बसमधून गावाच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे दिल्लीच्या रस्त्यांवर मोठी गर्दी झाली आहे. तर दिल्ली-उत्तर प्रदेशच्या सीमेवर मोठी गर्दी झाली आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र रोजगार जाऊन अनिश्चीतता निर्माण झाल्याने अनेक गावाकडे पलायन जात आहेत. रस्त्यावरून पायी निघालेल्या मजुरांसाठी योगी आदित्यनाथ सरकारने विशेष बसची सुविधा सुरू केली आहे. दरम्यान, यांची माहिती कळताच लोकांची मोठी गर्दी आनंद विहार बस डेपोमध्ये झाली. गाझियाबादमधील लाल कुवा येथील बस डेपोतही अशीच मोठी गर्दी झाली होती.
दरम्यान, देशात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. देशभरात आतापर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 900 च्या पुढे पोहोचली आहे. तर आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशासमोरही गंभीर आव्हान उभे राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे 14 एप्रिलपर्यंत देशात लोकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
दुसरीकडे यूरोपीय देश आणि अमेरिकेत कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. इटली, स्पेन, फ्रान्स, अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. संपूर्ण जगात मिळून कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या 27 हजारांवर पोहोचली आहे.