नवी दिल्ली: एकीकडे देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आता दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये काही दिवसांपूर्वीच तबलिगी समाजाच्या मरकजचं आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मरकजमध्ये सहभागी झालेले शेकडो लोक देशभरात गेल्यानं अनेक राज्यांची झोप उडाली आहे. मरकजमध्ये सहभागी झालेल्या २४ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या ३५० जणांना दिल्लीतल्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मरकजमध्ये सामील झालेल्या अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचं, शेकडो जण त्यांच्या संपर्कात आल्याचं समोर येऊनही मौलानांनी मरकजचं आयोजन करण्यात आलेली मशीद रिकामी करण्यास नकार दिला. त्यांनी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या आदेशांकडेही दुर्लक्ष केलं. अखेर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मध्यरात्री मशीद परिसरात धाव घेतली. गृहमंत्री अमित शहांनी त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली होती. गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोवाल २८-२९ मार्चच्या रात्री दोन वाजता मौलाना साद यांची भेट घेण्यास पोहोचले. मरकजमध्ये असलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याची सूचना डोवाल यांनी केली. याआधी मरकजमध्ये सहभागी होऊन तेलंगणात परतलेल्या नऊ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती पुढे आली होती. यानंतर मरकजनं २८ आणि २९ मार्चला १६९ तबलिगींना रुग्णालयात दाखल होण्यास परवानगी दिली. डोवाल यांनी हस्तक्षेप केल्यानं मशिदीची सफाई करण्यात आली. डोवाल यांनी गेल्या काही दशकांमध्ये देश, परदेशातल्या विविध मुस्लिम संघटनांशी अतिशय जवळचे संबंध प्रस्थापित केले आहेत. ते जवळपास सर्वच मुस्लिम मौलवी, उलेमांना ओळखतात. देशाचं संरक्षण धोरण आखताना डोवाल बराच वेळ त्यांच्या संपर्कातदेखील असतात.
CoronaVirus: मशीद रिकामी करण्यास मौलानांचा नकार; मध्यरात्री पोहोचले अजित डोवाल अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 1:53 PM