नवी दिल्ली - चीनसह अनेक देशांत कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्र सरकार सतर्क झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने बुधवारी कोविड स्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन केले आहे. गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची रॅपिड टेस्ट सुरू आहे. परदेशातून येणाऱ्यांची कोविड चाचणी होणार आहे. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं कोविड प्रोटोकॉलचं पालन करावं लागेल.
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लोकांनी बचावासाठी बूस्टर डोस घ्यावा, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. आत्तापर्यंत कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत, परंतु प्रतिबंधात्मक उपायांवर जोरदार काम सुरू झाले आहे. ज्या लोकांना आधीच कोणताही आजार आहे किंवा वृद्ध आहेत त्यांनी विशेषतः त्याचे पालन करावे. आरोग्य मंत्रालय दर आठवड्याला कोविड संदर्भात आढावा बैठक घेणार आहे.
चीनमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या कोविडसाठी ओमायक्रॉनचा BF.7 कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे. भारतातही याचे ४ रुग्ण आढळले आहेत. सूत्रांनुसार, ऑक्टोबरमध्ये गुजरातमध्ये या व्हेरिएंटची पुष्टी झाली होती. आतापर्यंत गुजरातमध्ये तीन आणि ओडिशातून एक रुग्ण समोर आला आहे. BF.7 हा BF.5 चा सब व्हेरिएंट आहे. जो Omicron चा एक व्हेरिएंट आहे. हा व्हेरिएंट संक्रमित असून फार लवकर तो दुसऱ्याला पसरतो. हा व्हेरिएंट आधीच यूएस, यूके, बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या युरोपियन देशांसह अनेक देशांमध्ये आढळला आहे.
आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल म्हणाले की, भारतातील ९८% लोकसंख्येने कोविडविरुद्ध नैसर्गिक अँन्टिबॉडी विकसित केली आहेत. लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. काही लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे आणि एक लहान लहर येण्याची शक्यता आहे. त्याशिवाय फारसा फरक पडणार नाही. दुसरीकडे, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला म्हणाले की, मोठ्या प्रमाणावर लसीकरण केल्यामुळे भारताला घाबरण्याची गरज नाही. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले पाहिजे.
केंद्र सरकारनंतर आज दिल्ली सरकारचीही कोरोनावर महत्त्वाची बैठक होणार आहे. बुधवारी दिल्लीत कोरोनाचे पाच रुग्ण आढळले. तेथे एका रुग्णाचा मृत्यू झाला. यूपी आणि कर्नाटक सरकारनेही कोविडबाबत पावले उचलली आहेत. यूपीच्या उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, कोविड-प्रभावित देशांमध्ये प्रवास करून परतलेल्या लोकांची तपासणी करण्यात यावी आणि विमानतळावर दक्षता वाढवावी. देशात कोविडची रोजची प्रकरणे २०० पेक्षा कमी आहेत. केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडू नवीन रुग्णांच्या बाबतीत आघाडीवर आहेत, परंतु एकूण रुग्णसंख्येत घट झाली आहे. २० डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, या पाच राज्यांमध्ये नवीन कोविड प्रकरणांपैकी ८४% प्रकरणे आहेत.