मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा जनेतशी संवाद साधला. यावेळी, पोलीस दलाचं कौतुक करत, सर्वसामान्य नागरिकांकडून लॉकडाऊन पाळण्यात येत असल्याचं ते म्हणाले. देशातील ९० टक्के लोक आदेशाचं पालन करत आहेत. पण, १० टक्के लोकांकडून अद्यापही लॉकडाऊनचं उल्लंघन होत असल्याचं पवार यांनी म्हटलंय. तसेच, दिल्लीतील मरकज कार्यक्रमाबद्दलही पवार यांनी आपलं मत व्यक्त केलंय. हा कार्यक्रम टाळायला पाहिजे होता, असे पवार यांनी म्हटले.
दिल्लीतील निझामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमातून शेकडो नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यापैकी काहींचा मृत्यू झाला आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून नागरिक उपस्थित राहिले होते. त्यामुळे देशभरातील विविध राज्यात या कार्यक्रमामुळे कोरोनाचा पसार झाला आहे. यासंदर्भात फेसबुक लाईव्हमध्ये शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, हा कार्यक्रम टाळायला हवा होता. मरकज कार्यक्रमामुळे देशभरात परिणाम झाला असून मुस्लिमांनी घरातच नमाज अदा करावी, असेह पवार यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात मरकजचे कोरोना कनेक्शन समोर आल्यानंतर देशात एकच खळबळ उडाली आहे. या मरकजमध्ये आलेल्या संशियात व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे आता मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तसेच, निजामुद्दीनमधील मरकजमधून तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये आलेल्या लोकांची तपासणी करण्याचे काम सुरु आहे. तेलंगणामध्ये १९४ लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर तामिळनाडूमध्ये ९८१ लोकांची वैद्यकीय तपासणी करण्याचे काम सुरु आहे. महाराष्ट्रातही शेकडो नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
दिल्लीतील मरकज खाली केल्यानंतर तबलीगी जमातीच्या १६७ लोकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. यापैकी ९७ डीजेल शेड ट्रेनिंगमध्ये तर ७० आरपीएफ बॅरेकमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती दीपक कुमार यांनी सांगितली आहे.