बधरघाट - भारतात कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 19,000 वर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. आत्तापर्यंत देशात कोरोनामुळे 640 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याच दरम्यान एका जोडप्याने आपल्या मुलाचं नाव 'लॉकडाऊन' ठेवल्याची घटना समोर आली आहे.
राजस्थानच्या अलवारमधून आलेल्या एका स्थलांतरीत मजूर दाम्पत्याला त्रिपुरामध्ये मुलगा झाला. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमुळे हे दाम्पत्य त्रिपुरामध्ये अडकलं आहे. याचदरम्यान त्यांनी आपल्या मुलाचं नाव 'लॉकडाऊन' असं ठेवलं. मिळालेल्या माहितीनुसार, त्रिपुरामध्ये संजय बौरी आणि मंजू बौरी या दाम्पत्याला मुलगा झाला असून हे स्थलांतरीत मजूर आहेत. मजुरीसाठी ते विविध राज्यांमध्ये फिरतात. सहा महिन्यांसाठी ते कामाच्या निमित्ताने त्रिपुरामध्ये येतात. त्याच दरम्यान त्यांना मुलगा झाला. त्यावेळी एका अधिकाऱ्याने बाळाचं नाव लॉकडाऊन ठेवा असं सूचवलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
लॉकडाऊनच्या काळात मुलगा जन्माला आल्याने आम्ही त्याचे नाव लॉकडाऊन ठेवावे असा विचार केल्याची माहिती मुलाच्या वडिलांनी दिली आहे. बाळ आणि त्याची आई दोघेही सुखरुप आहेत. प्रशासनाने देखील अडकून राहिलेल्या दाम्पत्याला योग्य ती सर्व मदत केल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये राहणाऱ्या एका जोडप्याला लॉकडाऊन दरम्यान मुलगा झाला. म्हणून या जोडप्याने आपल्या मुलाचं नाव 'लॉकडाऊन' असं ठेवलं होतं.
देवरियातील खुखुंदू गावचे रहिवासी असलेल्या पवनकुरा यांची पत्नी नीरजा गर्भवती होत्या. नीरजा यांनी 28 मार्चला गावातील सामाजिक आरोग्य केंद्रामध्ये एका मुलाला जन्म दिला. याच दरम्यान देशात कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. नागरिकही लॉकडाऊनचं पालन करत आहेत. अशा परिस्थितीत या जोडप्याने आपल्या मुलाचं नाव लॉकडाऊन ठेवलं. 'कोरोनाविरोधातील लढाईवर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः बारकाईने लक्ष देऊन आहेत. अशा परिस्थितीत जन्मलेला आमचा मुलगा मोदींच्या यशस्वी अभियानाचे प्रतिक आहे. हे अभियान यशस्वी करण्याचं आपल्या सर्वांचं उद्दिष्ट हवं' असं मुलाच्या वडिलांनी म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : जीवनावश्यक वस्तूंची होम डिलिव्हरी, 'या' सरकारची नवी हेल्पलाईन सेवा लय भारी
Coronavirus : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 19,984 वर, 640 जणांचा मृत्यू
Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
CoronaVirus: जगाचा आकडा २५ लाखांवर; राज्यात एकूण ५,२१८ रुग्ण