मुंबई - कोरोनाच्या लढाईत नागरिकांना घरी बसण्याचं आवाहन आणि कळकळीची विनंती करण्यात येत आहे. मात्र, तरिही नागरिक घरातून बाहेर पडत आहेत. रस्त्यावर उतरताना दिसून येत आहेत. पोलिसांनी बळाचा वापर सुरु केला, तर पोलिसांशी हुज्जत घालण्यात येत आहे. कोरोनाचं गांभीर्य अद्यापही अनेक शहरांमध्ये, विशेषत: ग्रामीण भागात दिसून येत नाही.लॉक डाऊनचं उल्लंघन करणाऱ्या या तरुणांना पोलीस वेवगेवळ्या प्रकारे धडा शिकवत आहेत. स्थलांतरीत आणि मजूरांना आहे त्याचजागी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, उत्तर प्रदेशात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थलांतरी आणि एकाच ठिकाणी जमलेल्या मजूरांना चक्क केमिकलयुक्त (सॅनिटाझरयुक्त) पाण्याने अंघोळ घालण्यात आली. याबाबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.
प्रियंका गांधींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये, सरकारी यंत्रणांकडून मजूर आणि स्थलांतरीतांच्या अंगावर चक्क केमिकलयुक्त पाण्याने फवारणी करण्यात येत आहे. प्रियंका यांनी याप्रकराबद्दल उत्तर प्रदेशातील योगी सरकारला लक्ष्य केले आहे. कृपा करुन असे अमानवी कृत्य करु नका, आपण सर्वजण एकत्र येऊन कोरोनाविरुद्धची लढाई लढत आहोत. कामगारांनी अगोदरच खूप सहन केलंय. अशा केमिकलयुक्त पाण्याने त्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता जास्त असल्याचे प्रियंका यांनी म्हटले आहे. कॅबिनेटमंत्री जयंत पाटील यांनी प्रियंका गांधींचे ट्विट रिट्विट करत, मी आपल्या मताशी पूर्णपणे सहमत असल्याचे म्हटले आहे. तसेच, या अमानवी कृत्याचा मी निषेध करतोय, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशच्या छतरपूर जिल्ह्यातील गोरीहार येथील पोलिसांनी लॉकडाऊनच उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवरही अशीच अमानवी कारवाई केली होती. येथील महिला पोलीस उपनिरीक्षकाने एका कामगार मुलाच्या कपाळावर, मैने लॉकडाऊन का उल्लंघन किया है.. मुझसे दूर रहना.. असा संदेशच काळ्या शाईने लिहिला. त्यानंतर, या महिला पोलीस उपनिरीक्षकावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार यांनी, संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, हे बेकायदेशीर कृत्य असल्याचे म्हटलंय. सध्या सोशल मीडियात उत्तर प्रदेशातील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओसह योगी सरकारवर टीकाही करण्यात येत आहे.