coronavirus: स्थलांतरितांमुळे केरळमध्ये कोरोना फैलावण्याचा धोका, रुग्णांपैकी ७० टक्के बाहेरून आलेले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 05:40 AM2020-05-14T05:40:20+5:302020-05-14T05:40:36+5:30
कोची : कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात काही प्रमाणात यश आलेल्या केरळपुढे आता एक वेगळेच आव्हान उभे ठाकणार आहे. अनेक ...
कोची : कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात काही प्रमाणात यश आलेल्या केरळपुढे आता एक वेगळेच आव्हान उभे ठाकणार आहे. अनेक देशांतूून तसेच विविध राज्यांतून केरळचे स्थलांतरित कामगार मोठ्या संख्येने परतत असून, त्यांच्यामुळे कोरोनाची लागण पुन्हा मोठ्या प्रमाणावर होणार नाही यासाठी राज्य सरकारला अत्यंत दक्ष राहावे लागणार आहे.
केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी सांगितले की, राज्यामध्ये असलेल्या कोरोना रुग्णांपैकी ७० टक्के रुग्ण हे स्थलांतरित कामगार आहेत. त्यांच्यामुळे केरळमधील इतर लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे. सध्या विविध राज्यांतून वाहनांनी ३३,११६ स्थलांतरित कामगार केरळच्या सीमेपर्यंत आले आहेत. इतर देशांतून हवाईमार्गे १,४०६, तर सागरीमार्गाने ८३३ जण राज्यामध्ये परततील. यात आणखी मोठी भर काही दिवसांत पडणार आहे.
केरळमधील वैद्यकीय व्यवस्थेची अनेक जण वाखाणणी करतात. विदेश तसेच विविध राज्यांतून केरळमध्ये आगामी काळात सुमारे ४ लाख २० हजार लोक पुन्हा परतण्याची शक्यता आहे. त्यात विविध राज्यांतून केरळला परतणाऱ्या दीड लाख स्थलांतरित कामगारांचा समावेश आहे.
इतक्या सर्व लोकांच्या आरोग्याकडे लक्ष देतानाच कोरोना रुग्णांसाठी क्वारंटाईनची चोख व्यवस्था राज्याच्या वैद्यकीय यंत्रणेला उभारावी लागेल. तीच तर खरी कसोटी आहे.
प्रवाशांची अॅन्टीबॉडी टेस्ट करून मगच त्यांना विमानात बसविण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी विमान कंपन्यांना द्यावा, अशी मागणी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केली आहे. आंतरराज्य प्रवासावरही काही निर्बंध असावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांना नुकतेच एका बैठकीत
सांगितले.
मार्गदर्शक तत्त्वांत फरक
क्वारंटाईनसंदर्भात केरळ राज्य सरकार व केंद्राने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांत फरक आहे. त्यामुळे त्याबाबत केरळ सरकारने स्पष्टीकरण द्यावे, असा आदेश केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे.
मजुरांमध्ये संसर्ग
मध्य-पूर्वेतील देशांत बांधकाम मजुरांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर झाला आहे. तिथे अशा किती लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. मध्य-पूर्व देशांमध्ये कोरोनामुळे २० केरळी लोक आतापर्यंत मरण पावल्याचे सांगण्यात येते.