नवी दिल्ली – कोव्हॅक्सिनला (COVAXIN) परवानगी देण्याऐवजी जागतिक आरोग्य संघटना(WHO) तारीख पे तारीख देत आहे. कॉव्हॅक्सिनला मंजुरी न मिळाल्याने लाखो लोकांची झोप उडाली आहे. विशेष म्हणजे जे लोक परदेशात जाऊ इच्छितात ते चिंतेत सापडले आहेत. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचलं आहे. काही जण दुसऱ्या कंपनीची लस घेण्यासही तयार झालेत. परंतु कोर्टाने अद्याप WHO च्या निर्णयाची वाट पाहणं उचित समजलं आहे.
Covaxin अनेक दिवसांपासून WHO च्या आपत्कालीन परवानगीसाठी वाट पाहत आहे. WHO च्या परवानगीनंतर कोव्हॅक्सिन घेतलेल्या लोकांसाठी परदेश दौऱ्यातील निर्बंधामध्ये शिथिलता येईल. त्याचसोबत कोव्हॅक्सिन इतर देशातही निर्यात करता येईल. दुसऱ्या देशात कोव्हॅक्सिन पुरवठा करण्यासाठी WHO च्या परवानगीची गरज आहे. WHO च्या आपत्कालनी वापराच्या लिस्टमध्ये कोव्हॅक्सिनचा समावेश झाल्यास या सगळ्या समस्या सुटल्या जातील.
आतापर्यंत WHO नं ६ लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे.त्यात फायझर बायोटेक, एसके बायो, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, एस्ट्राजेनेका, मॉडर्ना आणि सिनोफार्म लसींचा समावेश आहे. कोव्हॅक्सिनला मान्यता नसल्याने युरोपीय देश आणि अमेरिका ही लस घेतलेल्या लोकांना देशात प्रवेश करण्यापासून मागे हटत आहे. या लोकांना लसीकरण न झालेल्या लोकांमध्ये मानलं जात आहे. काही देशांनी भारतीय व्हॅक्सिनला मान्यता दिली आहे. त्यात मॅस्किको, नेपाळ, फिलिपींस, इराण, मॉरिशस, ओमानसारख्या देशांचा समावेश आहे.
WHO च्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष
कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेले लोक ज्यांना परदेशात जायचं आहे ते WHO च्या निर्णयाकडे आस लावून आहेत. आणखी किती काळ परवानगीसाठी वाट पाहावी लागेल याची कुणालाही माहिती नाही. भारत बायोटेकच्या कोविड १९ लसीसाठी प्रतिक्षा करणं इतकंच हातात आहे. प्रत्येकवेळी मान्यतेऐवजी नवीन तारीख दिली जाते. ऑक्टोबरमध्ये कोव्हॅक्सिनला मान्यता दिली जाईल असं बोललं जात होतं. परंतु संघटनेच्या तांत्रिक समितीने आणखी काही कागदपत्रांची मागणी केली आहे.
मान्यता मिळाली नाही तर...
भारताने अलीकडेच १०० कोटी लसीकरणाचा आकडा ओलांडला आहे. चीननंतर भारत एकमेव देश आहे ज्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण केले आहे. त्यात कोव्हॅक्सिन लस घेणाऱ्यांची संख्याही कोट्यवधीच्या घरात आहे. देशात कोविशील्ड(Covishiled) आणि कोव्हॅक्सिन याच मुख्य लसीच नागरिकांना दिल्या जात होत्या. त्यामुळे आता ही चिंता सतावतेय की जर WHO नं कोव्हॅक्सिनला परवानगी नाकारली तर लोकांना परत दुसरी लस घ्यावी लागेल की, त्या लोकांना लसीकरण न झालेल्यांच्या गटात मानलं जाईल? कोव्हॅक्सिन घेतलेल्यांना परदेश दौरा करता येणार नाही असे विविध प्रश्न सध्या डोकं वर काढत आहेत.