नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. आता देशात 4 मे पासून 17 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यासंदर्भात गृह मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केला होता. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊन वाढविण्यात आल्याचे शुक्रवारी परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असेल आणि ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, ग्रीन आणि ऑरेंज झोनसाठी काही अटी-शर्ती शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र, रेड झोनमध्ये कडक संचारबंदी असणार आहे.
दरम्यान, देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढविला आहे. कोरोना बाबतची संपूर्ण देशातील स्थिती पाहता सर्वात जास्त जिल्हे रेड झोन मध्ये उत्तर प्रदेशातील असून तब्बल 19 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसरा नंबर महाराष्ट्राचा लागत असून, तिसरा नंबर तामिळनाडूचा आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण देशभरात झपाट्याने वाढतच चालले आहे. लॉकडाऊनमुळे मोठे आर्थिक नुकसान होत असून लॉकडाऊन शिथिल केल्यास कोरोनाच्या संसर्गाची भीती अशा दुहेरी संकटात देश सापडला आहे. या पेचातून मार्ग काढण्यासाठी केंद्र शासनाने देशभरातील जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन झोनमध्ये वर्गीकरण करून त्याची यादी आज सकाळी प्रसिद्ध केली आहे.
केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सूदन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या स्थितीचा आढावा घेऊन देशभरातील जिल्ह्यांचे वर्गीकरण रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये करण्यात आले आहे. प्रत्येक राज्याने त्यानुसार रेड आणि ऑरेंज झोनच्या क्षेत्रात कंटेनमेंट झोन आणि बफर झोनच्या हद्दी निश्चित करून केंद्र शासनाला सूचित करावे. कोणत्याही जिल्ह्याला तोपर्यंत ग्रीन झोन मानण्यात येणार नाही जोपर्यंत त्या जिल्ह्यामध्ये सलग 21 दिवस नव्याने कोरोनाने बाधित झाल्याचे एकही केस नसेल.
सरकारने जाहीर केलेल्या यादीमध्ये देशभरातील 130 जिल्हे रेड झोन मध्ये, 284 जिल्हे ऑरेंज झोन मध्ये तर 319 जिल्हे ग्रीन झोन मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील महानगरपालिका क्षेत्र व अन्य क्षेत्रांना वेगवेगळे वर्गीकरण करता येऊ शकेल. रेड किंवा ऑरेंज झोन मध्ये असलेल्या जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्र व तालुका क्षेत्र अशी विभागणी करून ज्या ठिकाणी मागील 21 दिवसात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नसेल अशा ठिकाणी झोनचा दर्जा कमी करता येईल.