मुंबई - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सुमारे सव्वा दोन महिने देशातील सर्व व्यवहार ठप्प होते. दरम्यान, आजपासून देश अनलॉक करण्याची प्रक्रिया हळूहळू सुरू करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये धार्मिक स्थळे, रेस्टॉरंट्स आणि मॉल्स सर्व प्रकारची खबरदारी घेऊन सुरू केले आहेत. मात्र देशातील एक राज्य याला अपवाद ठरले असून, इथे लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्यात आले आहे.
या राज्याचे नाव आहे मिझोराम. मिझोराममध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी अजून वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मिझोराम सरकारने सांगितले की, मुख्यमंत्री जोरमथांगा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील सध्याची परिस्थिती पाहून संपूर्ण लॉकडाऊन ९ जून पासून पुढे अजून दोन आठवड्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील.
मिझोरामममध्ये आतापर्यंत कोरोनाचे ४२ रुग्ण सापडले आहेत. यापैकी एक रुग्ण बरा झाला आहे. तर राज्यात अद्याप ४१ अँक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत कुणाचाही मृत्यू झालेला नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या