नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय प्रवाशांबाबत केंद्राने केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महाराष्ट्राने आपल्या नियमांत बदल करावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. देशात सर्वच ठिकाणी सारखेच कोरोना प्रतिबंधक नियम असणे आवश्यक आहे, असे केंद्राने म्हटले आहे.
या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र सरकारला एक पत्र लिहिले आहे. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांतील चार मुद्द्यांबाबत केंद्राने आपल्या पत्रात भर दिला आहे. (१) कोणत्याही देशातून आलेला प्रवासी असो, त्याची मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरटी-पीसीआर चाचणी करण्यात यावी. (२) ज्यांच्या आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असला, तरी त्यांना सक्तीच्या १४ दिवसांच्या होम क्वारंटाइनमध्ये राहावे लागणार आहे.
कनेक्टिंग फ्लाइट पकडण्यासाठी मुंबई विमानतळावर आलेल्या प्रवाशांचीही आरटी-पीसीआर चाचणी करण्यात यावी, तिचा निष्कर्ष निगेटिव्ह आला तरच या प्रवाशांना पुढील प्रवासाची परवानगी द्यावी; त्याशिवाय इतर राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची प्रवास सुरू करण्याच्या ४८ तास आधी आरटी-पीसीआर चाचणी करून घ्यावी. तिचा निष्कर्ष निगेटिव्ह असणे आवश्यक आहे; या मुद्द्यावरही केंद्र सरकारच्या पत्रात भर देण्यात आला आहे.
समान धोरणाची दिली ग्वाहीकेंद्राने जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे तसेच भविष्यातील उपाययोजनांच्या प्रमाणेच आमचे धोरण असेल, अशी ग्वाही महाराष्ट्र सरकारने दिली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी राज्यानेही कडक पावले उचलण्याचे ठरविले आहे.