नवी दिल्ली: देशातील कोरोनाचं संकट दिवसागणिक गंभीर होत चाललंय. या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. यातले जवळपास दोन आठवडे पूर्ण होत आले आहेत. मात्र गेल्या काही दिवसांत देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढतेय. त्यामुळे आता सरकारनं कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर देण्यास सुरुवात केली आहे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज अनेक दिवसांपासून वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत होती. त्यादृष्टीनं सरकारनं पावलं टाकण्यास सुरुवात केली असून आरटी-प्रोसेसच्या माध्यमातून दर दिवशी चाचण्यांची संख्या दुप्पट करण्याचा प्रयत्न आहे. आरटी-प्रोसेसच्या माध्यमातून सर्वात अचूक चाचण्या केल्या जातात. त्यामुळे याच पद्धतीचा वापर चाचण्यांसाठी करण्यात येणार आहे. सध्या आयसीएमआरच्या अंतर्गत काम करणाऱ्या लॅब्स दर दिवशी १० हजार चाचण्या करतात. पुढल्या ३ दिवसांत यांची संख्या दुप्पट करण्याचं ध्येय ठेवण्यात आलंय. पुढील काही आठवडे ही क्षमता आणखी वाढवण्यावर काम केलं जाणार आहे. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षयरोगाच्या चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या २५० ट्रूनॅट आणि २०० सीबी-नॅट यंत्रांचांदेखील संभाव्य कोरोना रुग्णांच्या चाचणीसाठी वापर करण्यात येईल. 'ट्रूनॅट आणि सीबी-नॅटनं एका दिवशी १२ चाचण्या केला जाऊ शकतात. आमच्याकडे रोशेची २ कोबॅस-६८०० यंत्रं आहेत. याशिवाय आणखी दोन यंत्रांच्या ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत. या यंत्राच्या माध्यमातून दर दिवशी ५ हजार चाचण्या केल्या जाऊ शकतात,' असंदेखील त्यांनी सांगितलं.सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन चाचण्यांची संख्या वेगानं वाढवण्यासाठी रणनीती तयार करणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. आवश्यकता असलेल्या प्रकरणांच्या चाचण्या व्हाव्यात, यासाठी आरोग्य मंत्रालय आग्रही आहे. अनावश्यक चाचण्या करून यंत्रणेवरील ताण वाढवयाचा नाही, असं मंत्रालयानं अप्रत्यक्षपणे स्पष्ट केलंय.
CoronaVirus: कोरोनाच्या मुळावर हल्ला करण्यासाठी सरकार सज्ज; मेगा प्लान तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 8:49 AM