कोलकाता – देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसत आहे. तर अनेकांना नोकरी जाण्याची भीती सतावत आहे. अशातच सणांच्या दिवसात लॉकडाऊन आल्याने अनेक हिंदू पुजाऱ्यांना आर्थिक चणचण भासू लागली आहे.
पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊनमुळे सामाजिक आणि धार्मिक आयोजन स्थगित करण्यात आल्याने सुमारे २ लाख हिंदू पुजारी बेरोजगार झाले आहेत. पंडीत संघटनेचे प्रवक्ते म्हणाले की, मोठ्या प्रमाणात घरांमध्ये होणारे धार्मिक पूजा विधी बंद झाले आहेत. ज्यामुळे पुजाऱ्यांची कमाई बंद पडली आहे. लग्न आणि अन्य सामाजिक सोहळे बंद झाले आहेत. लॉकडाऊनमुळे मंदिरेही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लोक मंदिरातही येऊ शकत नाहीत असं ते म्हणाले.
जर आगामी काळात कोणतीही पूजा अथवा धार्मिक कार्यक्रम झाले नाही तर पुजारी आपला उदरनिर्वाह कसा करणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे २ लाखांहून अधिक पुजारी बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे पुजाऱ्यांना सरकारने मदत करावी अशी मागणी संघटनेच्या वतीने पत्र लिहून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना करण्यात येणार आहे.
तसेच अनेक पुजाऱ्यांकडे उत्पन्नाचं कोणतंही दुसरं साधन नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंब पूर्णपणे पूजा, लग्न आणि अन्य धार्मिक सोहळ्यावर अवलंबून असते. त्या कमाईवर त्यांचे कुटुंब चालते. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री प्रताप सारंगी यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना पुजारी आणि सेवेकरी यांना आर्थिक पॅकेज जाहीर करा अशी आग्रही मागणी केली होती.
महाराष्ट्रातही लॉकडाऊनमुळे अनेक मंदिरे बंद करण्यात आली आहे. भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचसोबत लॉकडाऊनमुळे अनेक लग्न रखडली आहेत. पुढील आदेश येईपर्यंत कोणतेही धार्मिक कार्यक्रम घेऊ नये असा आदेश सरकारने दिला आहे. त्यामुळे पुजाऱ्यांना येत्या काळात आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागू शकतं असं सांगण्यात येत आहे.