Coronavirus: लग्नात जमली ५००हून अधिक लोकांची गर्दी, पोलिसांनी व-हाड्यांना मारायला लावल्या बेडूक उड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 04:49 PM2021-05-20T16:49:24+5:302021-05-20T16:49:57+5:30
Coronavirus: कोरोनाकाळात लग्नसमारंभांवरही अनेक बंधने लागू करण्यात आली आहेत. मात्र तरीही अनेक ठिकाणी नियम मोडून लग्न समारंभ आयोजित केले जात आहेत. मात्र असे समारंभ आयोजित करणाऱ्या यजमानांवर पोलिसांकडून कारवाईही करण्यात येत आहे.
भोपाळ - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनाकाळात लग्नसमारंभांवरही अनेक बंधने लागू करण्यात आली आहेत. मात्र तरीही अनेक ठिकाणी नियम मोडून लग्न समारंभ आयोजित केले जात आहेत. मात्र असे समारंभ आयोजित करणाऱ्या यजमानांवर पोलिसांकडून कारवाईही करण्यात येत आहे. अशा कारवाईचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कोरोनाचे नियम मोडून आयोजित करण्यात आलेल्या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या व-हाडी मंडळींना पोलीस बेडूक उड्या मारण्याची शिक्षा देत असल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर या लग्नसोहळ्यातील वरासह मंडपाच्या मालकावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना मध्य प्रदेशातील भिंड येथील उमरी गावात घडली आहे. भिंडमधील उमरी येथे आदिवासी कल्याण विभागाच्या वसतीगृहात बुधवारी या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विवाह सोहळ्याचे निमंत्रण ५००हून अधिक लोकांना देण्यात आले होते. जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिथे ३००हून अधिक लोक उपस्थित होते.
पोलीस आल्याची चाहूल लागताच विवाह स्थळावर पळापळ सुरू झाली. मात्र काही लोकांना पोलिसांनी शिताफीने पकडले. त्यानंतर त्यांना भर रस्त्यात बेडूक उड्या मारायला लावल्या. तसेच वरपक्षाच्या मंडळींना नियमभंग केल्याप्रकरणी चांगलाच दम दिला.
यासंदर्भात व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका शेताच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर पोलीस अनेक लोकांना बेडूक उड्या मारायला लावत असल्याचे दिसत आहे. तसेच व्यवस्थित बेडूक उड्या मारत नसलेल्या एका व्यक्तीवर पोलीस दंडुक्याचा प्रहार करताना दिसत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याने त्याची खूप चर्चा होत आहे.