नवी दिल्ली - सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केल्यानंतरही देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढतच आहे. त्यामुळे शासन, प्रशासन आणि सर्वसामान्यांची चिंता दिवसागणिक वाढत आहे. दरम्यान, दिल्लीतील एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी एक चिंता वाढवणारे भाकीत केले आहे.
एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले की, ‘’कोरोनाची सद्यस्थिती पाहता आपल्याला कोरोनासोबत जगावे लागणार आहे, तसेच जून महिन्यामध्ये भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळतील,’’ अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा फायदा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढलेले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
सध्याचा ट्रेंड पाहता कोरोनाचे रुग्ण जून महिन्यात आपल्या सर्वोच्च पातळीवर असतील. मात्र हा आजार झटपट संपून जाईल असे नाही. आपल्याला कोरोनासोबत राहावे लागेल. हळूहळू कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल, असे ते म्हणाले.
आपल्याला लॉकडाऊनचा निश्चितपणे फायदा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे आपल्या देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेला नाही. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमी प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. रुग्णालयांनी लॉकडाऊनदरम्यान पुरेशी तयारी करून ठेवली आहे. डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच पीपीई किट्स, व्हेंटिलेटर्स आणि वैद्यकीय उपकरणांची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या...
मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा १०००० पार; आज ७५९ नवे रुग्ण
OMG! राज्यात कोरोनाचा 'विस्फोट'; नव्या रुग्णांच्या संख्येने सरकारची चिंता वाढली
CoronaVirus धारावीने चिंता वाढवली; नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ
CoronaVirus व्वा...! राज्यात केवळ दोन दिवसांत ७०० रुग्ण ठणठणीत झाले
दरम्यान, कोरोनाचे रुग्ण कधीपर्यंत आढळतील. हा आजार किती दिवसांपर्यंत अस्तित्वात राहील, याबाबत निश्चितपणे काही सांगता येणार नाही. मात्र एक बाब निश्चित आहे ती म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट शिखरावर असते तेव्हा तिथूनच तिच्या उतरणीला सुरुवात होते. भारतात जूनमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडतील. त्यानंतर हळूहळू कोरोना उतरणीला लागेल, अशी अपेक्षा करूया.
आतापर्यंत देशात कोरोनाचे ५० हजारहून अधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. देशात आतापर्यंत १७८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.