नवी दिल्ली – देशात कोरोनाची दुसरी लाट हळूहळू शांत होत आहे. परंतु अद्यापही तज्ज्ञ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देऊन त्यासाठी तयारी करण्यासाठी सल्ला देत आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी विशेष प्लॅनिंग करण्यात येत आहे. केंद्र सरकारने लहान मुलांवरील कोरोना उपचारासाठी नवीन गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. यात वयस्क माणसांच्या उपचारासाठी वापरण्यात येणारी औषधं लहान मुलांवर वापरू नये असं स्पष्ट सांगितले आहे.
स्वत: डॉक्टर बनू नका, एक चूक महागात पडेल
कोरोना महामारीच्या काळात अनेकदा असं पाहायला मिळत आहे की, अनेकजण लक्षण दिसल्यानंतर डॉक्टरांच्या परवानगीशिवाय बाजारातून औषधं खरेदी करून त्याचे सेवन करत आहेत. ही धोकादायक आणि जीवघेणे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध घेऊ नये असं वारंवार तज्त्र सांगत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप मेसेज व्हायरल होतात त्याला अनुसरून लोक घरीच प्रयोग करतात. इतर माध्यमातून औषधांविषयी माहिती करून घेतात आणि डॉक्टरांचा सल्ला न घेता त्याचा वापर करतात. परंतु लहान मुलांच्या बाबतीत सावधानता बाळगणं गरजेचे आहे. कारण कोरोनाच्या उपचारात वयस्क लोकांसाठी वापरण्यात येणारी औषधं लहान मुलांना देऊ शकत नाहीत.
लहान मुलांच्या उपचारासाठी मार्गदर्शक सूचना जारी
सरकारने बुधवारी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत कोविड १९ वयस्क रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या आयवरमेक्टिन, हायड्राक्सीलोरोक्वीन, फेविपिरावीरसारख्या औषधं आणि ड्रॉक्सीसायक्विन, एजिथ्रोमायसिनसारख्या औषधांचा वापर उपचारात न करण्याचा सल्ला दिला आहे.
काही काळानंतर महामारीच्या रुग्णांमध्ये परत वाढ होऊ शकते. सरकारने त्यासाठी खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. गंभीर कोरोना व्हायरसनं संक्रमित लहान मुलांना तात्काळ वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी सध्याच्या स्थितीत असलेले कोविड सेंटरची संख्या वाढवली जावी. कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीची परवानगी मिळाल्यानंतर लहान मुलांना लस देण्यासाठी प्राधान्य द्यावं जे अन्य आजाराने पीडित आहेत आणि कोविड १९ गंभीर रुग्ण आहेत.
लॉकडाऊन हटवल्यानंतर अथवा शाळा सुरु केल्यानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत. कोविड १९ उपचाराबाबतची नियमावलीचं पालन केले जावं. तिसऱ्या लाटेत लहान मुलांचा अधिक धोका असल्याने त्यांच्यासाठी अतिरिक्त बेड्स उपलब्ध करावेत. दुसऱ्या लाटेत जिल्ह्यांमधील संक्रमित रुग्णांची संख्येची आकडेवारी पाहून याचा आढावा घेऊ शकता. आणखी किती बेड्सची आवश्यकता भासेल याचा अंदाज येईल.
लहान मुलांच्या आरोग्यासाठी सध्या अस्तित्वात असणाऱ्या कोविड सेंटरची संख्या आणखी वाढवायला हवी. या केंद्रात लहान मुलांशी निगडीत वैद्यकीय उपकरणं आणि औषधं यांची गरज भासणार आहे. त्यासाठी राज्यांनी तयारी करून ठेवायला हवी.