एस. के. गुप्ता नवी दिल्ली : कोरोना संसर्गावर स्वदेशात बनविलेली कोव्हॅक्सिन ही पहिली प्रतिबंधक लस स्वातंत्र्यदिनी, १५ आॅगस्टपासून उपलब्ध करून देण्याकरिता इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च या संस्थेने (आयसीएमआर) कंबर कसली आहे. पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी व भारत बायोटेक यांच्या सहकार्याने तयार होत असलेल्या कोव्हॅक्सिनच्या माणसांवरील चाचण्या ७ जुलैपासून सुरू कराव्यात असे पत्र आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी संबंधित बारा संस्थांना पाठविले आहे.
आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी या पत्रात म्हटले आहे की, कोरोना संसर्गावर प्रतिबंधक लस तयार करण्याचा देशाचा हा पहिलावहिला व महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्या चाचण्यांचे निष्कर्ष काय येतात याकडे केंद्र सरकारचे लक्ष आहे. कोव्हॅक्सिन लसीच्या माणसांवर चाचण्या करण्याच्या कामात सहभागी असलेल्या १२ संस्थांनी आपले प्रयोग जलद गतीने पार पाडावेत.
येत्या १५ आॅगस्टपासून ही लस उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे असे या संस्थांना कळविण्यात आले होते. या मानवी चाचण्या पार पाडण्याची जबाबदारी भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) या कंपनीकडे सोपविण्यात आली आहे.कोव्हॅक्सिन या लसीच्या माणसांवरील चाचण्या पार पाडण्यासाठी सक्रिय असलेल्या १२ संस्थांमध्ये दिल्लीच्या एम्सचाही समावेश आहे.एम्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आयसीएमआरने लसीच्या माणसांवरील प्रयोगांबाबत पाठविलेले पत्र एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांना मिळाले आहे. या चाचण्यांबाबत एम्सच्या संबंधित विभागात सविस्तर चर्चा होऊन मगच कामाला सुरूवात केलीजाईल.आरोग्य खात्याने आयसीएमआरकडे दाखविले बोट
- कोव्हॅक्सिन लसीच्या माणसांवर फक्त सव्वा महिनाच चाचण्या होण्याची शक्यता आहे. त्यांचे निष्कर्ष १५ आॅगस्टपर्यंत हाती यावेत अशी अपेक्षा आयसीएमआरने व्यक्त केली आहे.
- मात्र केवळ सव्वा महिन्याच्या चाचण्यांच्या बळावर ही लस सर्वांना कशी काय उपलब्ध करून देता येईल, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्या प्रश्नाचे उत्तर केंद्र सरकारकडे नाही व आयसीएमआरने याबाबत मौन धारण केले आहे.
- आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी मानवी चाचण्यांबद्दल पाठविलेल्या पत्राबाबत केंद्रीय आरोग्य खात्याच्या सचिव डॉ. प्रीती सुदान यांनी सांगितले की, हे पत्र आयसीएमआरने लिहिलेले असल्याने हीच संस्था त्याबाबत अधिक काही सांगू शकेल.
- या विषयावर कोणतेही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला. आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांच्याशी या विषयाबाबत लोकमतने अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.