मुंबई - मुस्लीम समाजातील कोरोना संक्रमित व्यक्तींच्या निधनानंतर स्मशानभूमीत त्यांच्यावर होणाऱ्या अंत्यंसस्काराबाबत तेलंगणा सरकारने काही सूचना आणि महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत. हैदराबादचे खासदार आणि एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी तेलंगणा सरकारने केलेल्या सूचनांचे स्वागत केले आहेत. तसेच मुस्लीम समाजातील नागरिकांना आवाहनही केलं आहे. दफनविधीवेळी स्मशानभूमित ५ पेक्षा जास्त नागरिकांनी जाऊ नये, आपल्यातील एखाद्या व्यक्तीला गमावणे हे खूप मोठ दु:ख आहे. मात्र, आपल्यामुळे इतर कुणाला त्रास होणार नाही, याची खबरदारी आणि जबाबदारी आपली आहे. याचेही भान आपल्याल असणे आवश्यक आहे, असे ट्विट असुदुद्दीन औवेसी यांनी केले आहे.
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याबाबात जागतिक आरोग्य संघटना व केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. त्यानुसार तेलंगणा सरकारने परिपत्रक काढून कोरोना संक्रमित रुग्णाच्या मृतदेहाच्या दफनविधीसंदर्भात काही महत्वाच्या सूचना आणि निर्देश दिले आहेत. खासदार औवेसी यांनी याबद्दल तेलंगणा सरकारचे आभार मानले आहेत. तसेच, नमाज ए-जनाना याचा अर्थ गर्दी करणे हा होत नाही. केवळ २ लोकांनी जरी या जनाना दफनविधीमध्ये भाग घेतला तरी ते आदर्श काम आहे. तसेच स्मशानभूमीतच नमाज-ए-जनाना करण्यात यावे, असे मुस्लीम समाजातील व्यक्तींना उद्देशून औवेसी यांनी लिहिले आहे. मुस्लीम समाजातील व्यक्तींच्या दफनविधी क्रियेबद्दलच्या महत्वपूर्ण सूचनांबद्दल औवेसी यांनी मौलाना खालिद सैफुल्ला रहमानी, मुफ्ती खलील अहमद, हामिद मोहम्मद खान, मौलाना हाफिद पीर शब्बीर आणि मुफ्ती घियास यांचेही आभार मानले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातही कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतरही संसर्गाचा धोका असल्याने त्या मृतदेहाचे आगीत दहन करावे, अशा मार्गदर्शकतत्त्वा प्रमाणे मुंबई महापालिका प्रशासनाने परिपत्रक काढले होते. मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात मृतदेह दफन करण्याची परंपरा असल्याने राज्य मंत्री नवाब मलिक यांनी पालिका आयुक्तांशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर काही तासांतच पालिकेने हे परिपत्रक मागे घेतले. नव्या परिपत्रकानुसार कोरोना व्हायरस आजूबाजूला पसरणार नाही, एवढी मोठी दफनभूमी असल्यास मृतदेह दफन करण्याची परवानगी मिळेल, असे पालिकेने स्पष्ट केले.