नवी दिल्ली - कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. देशभरात रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून एकूण रुग्णसंख्येने तब्बल दीड कोटीचा टप्पा आता पार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. अनेक राज्यांमध्ये भयावह परिस्थिती आहे. रुग्णालयात ऑक्सिजनचा अभाव, व्हेंटिलेटर आणि बेड्सची कमतरता, लस आणि रेमडेसिवीरसारख्या तुटवडा निर्माण झाला आहे.
भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,56,16,130 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (21 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत 2,95,041 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दीड कोटीवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा एक लाख 82 हजारांवर पोहोचला आहे. याच दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी लसीकरण आणि कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत 12,71,00,000 हून अधिक जणांना कोरोनावरील लस दिली गेली आहे. मृत्यू दरही 1.18 टक्के इतका कमी झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी देशात आयसीयू बेडवर 1.93 टक्के रुग्ण होते. आता ही संख्या कमी होऊन 1.75 टक्के इतकी झाली आहे. दोन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटवर 0.40 टक्के रुग्ण होते. आता ही संख्या तेवढीच आहे. सोमवारी देशात ऑक्सिजन सपोर्टवर 4.29 टक्के रुग्ण होते. ते आता 4.03 टक्के इतके आहेत अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली. गेल्या वर्षी होम आयसोलेशनमध्ये 80 टक्के रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. यावर्षी कोरोना रुग्णांच्या उपचारात आपली सुरुवात चांगली आहे. पण आपल्याला आरोग्य सुविधा आणखी वाढवण्याची गरज आहे. आपण सध्या रुग्णालयामध्ये तात्पुरते बेड बनवत आहोत असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती सांगताना मुंबईतील एक तज्ज्ञ डॉक्टरही भावूक झाल्या आहेत. मुंबईतील इन्फीशियस डिसीज फिजीशियन डॉ तृप्ती गिलाडा (Dr. Trupti Gilada) यांनी कोरोनाची भयंकर परिस्थिती सांगणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांचा अश्रूंचा बांध फुटला आहे. कोरोनाचं संकट, रुग्णालयात नेमकी काय परिस्थिती आहे. लोकांनी काय करायला हवं यावर डॉ. तृप्ती गिलाडा यांनी व्हिडीओमध्ये भाष्य केलं आहे. अशी परिस्थिती मी याआधी कधीच पाहिली नाही. आम्ही खूप हतबल आहोत. इतर डॉक्टरांप्रमाणे मीसुद्धा घाबरले आहे. काय करावं ते समजत नाही असं म्हटलं आहे.