पुणे : कोरोनाच्या संकटाच्या काळात जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील भादरवा भागातील कुटुंबाने माणुसकीचे दर्शन घडवले. माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी जम्मू काश्मीरला गेलेले पुण्यातील तिघे जण अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे भादरवा व्हॅलीमध्ये अडकून पडले. तेथील स्थानिक कुटुंबाने त्यांना गेल्या ३२ दिवसांपासून आश्रय दिला असून, आपल्याच कुटुंबाचा भाग करून घेतले आहे. हा अनुभव पुण्यातील प्रवाशांना ‘काश्मिरियत’ची झलक दाखवणारा ठरला.नचिकेत गुत्तीकर, शमीन कुलकर्णी आणि निनाद दातार एका माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी १५ मार्च रोजी जम्मू काश्मीरला गेले होते. काम संपवून २५ मे रोजी पुण्यात परतण्याच्या तयारीत असतानाच कोरोनाच्या संसर्गामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाला आणि ते सर्व जण अडकून पडले. मात्र, केंद्र सरकारकडून सर्व विमानसेवा बंद झाल्याची घोषणा करण्यात आली. जम्मू काश्मीरमधील हॉटेल आणि वाहतूक सेवाही बंद झाली. अचानक उद्भवलेल्या संकटामुळे अनोळखी प्रदेशात काय करावे, असा सर्वांनाच प्रश्न पडला. अशा वेळी स्थानिक लोक त्यांच्या मदतीला धावून आले. गाथा या गावातील एका कुटुंबाने त्यांच्याबरोबर राहण्याची परवानगी दिली. दोन दिवस त्या कुटुंबासमवेत राहिल्यानंतर पुण्यातील प्रवाशांचे तेथील दवाखान्यात विलगीकरण करण्यात आले. स्थानिक कुटुंबातील आझीम नावाचा मुलगाही १४ दिवस त्यांच्यासमवेत विलगीकरणात राहिला. यातून प्रवाशांना खरी ‘काश्मिरियत’ अनुभवायला मिळाली.‘गेल्या ३२ दिवसांपासून आम्ही काश्मीरमधील कुटुंबाबरोबर राहत आहोत. मात्र, एकही क्षण त्यांनी आम्हाला एकटेपणाची जाणीव होऊ दिलेली नाही. भारताच्या इतर भागांमध्ये माणुसकीची झलक पाहायला मिळाली नसती.’, अशी भावना नचिकेत गुत्तीकर यांनी व्यक्त केली.सध्या परिस्थिती खडतर असल्याने येथून निघणे शक्य नाही. आमच्यासारखे अनेक लोक विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. मात्र, येथील कुटुंबाने आम्हाला त्यांच्यात सामावून घेतले आहे. घरच्या लोकांची खूप आठवण येते, पण परिस्थितीला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही. केंद्र सरकारकडून सर्व घोषणा अचानक होतात, त्यामुळे तयारीलाही वेळ मिळत नाही. परिस्थितीबाबत काही अंदाज आला तर त्याप्रमाणे पावले उचलता येतात. जम्मू काश्मीरसारखा आपुलकीचा अनुभव इतरत्र आला नसता.- नचिकेत गुत्तीकर
CoronaVirus: जम्मू-काश्मिरातील कुटुंबाने दाखवली माणुसकी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 1:16 AM