लखनौ - संपूर्ण देशात वाढत असलेला कोरोनाचा फैलाव आणि या विषाणूने ग्रामीण भागात केलेला शिरकाव यामुळे शासन आणि प्रशासन त्रस्त आहे. त्यातच आता उत्तर प्रदेशमधील शामली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सोंटा रसूलपूर गावामध्ये अज्ञान आजारामुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण तापाने फणफणत आहेत. गावात सातत्याने होत असलेल्या मृत्युंमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच त्यामुळे ग्रामस्थांनी स्वत:ला घरांमध्ये कोंडून घेतले आहे. गावातील रस्त्यांवर शुकशुकाट पसरला असून, गावात कोरोनाचा संसर्ग सुरू झाला असावा, अशी भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच झालेल्या मृत्यूंचे कारणही कोरोना आहे, असा ग्रामस्थांचा दावा आहे. (Mysterious disease spreads in the village In UP, 5 death)
मात्र हा आजार कोरोना आहे की अन्य काही याबाबत सध्यातरी स्पष्टता येऊ शकलेली नाही. कारण सरकारी आकडेवारीमध्ये सोंटा रसूलपूर गावात कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद नाही. मात्र अनेक लोक रहस्यमय आजारामुळे मृत्युमुखी पडले आहेत.
या रहस्यमय आजाराने मृत्यू झालेल्यांची नावे नझीर, हासिद, आबिदा, तन्वीर आणि अफसाना यांचा समावेश आहे. मात्र हा आजार पसरत असताना या भागात प्रशासनाचा कुठलाही अधिकारी फिरकला नाही. तसेच आरोग्य विभागाने शिबीर घेऊन तपासणी केली नाही, असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र सातत्याने होत असलेल्या मृत्युंमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सामान्य मृत्यू असेल तर कोविडचे नियम पाळले जात नाहीत. मात्र दहशतीचे वातावरण असल्याने या मृतांच्या अंत्ययात्रेमध्ये फारसे नातेवाईक सहभागी होत नाही आहेत. तसेच ग्रामस्थही तुरळक प्रमाणातच अंत्ययात्रेला हजेरी लावत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची शामलीच्या डीएम जसजीत कौर यांनी दखल घेतली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात घरोघरी सर्वै करण्यात येत आहे. पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच निरीक्षण समित्याही तैनात करण्यात आल्या आहेत. ही मोहीम एकूण पाच दिवसांची होती. मात्र आता तिचा अवधी वाढवण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच ग्रामीण भागातील संसर्गाला अटकाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्या म्हणाल्या.