नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या महासंकटाच्या काळात लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील मोठमोठ्या नेत्यांना मागे टाकत शिखरावर पोहोचले आहेत. एका पाहणीमध्ये मोदींची लोकप्रियता थेट ६८ टक्क्यांवर गेली आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता ३ टक्क्यांनी घसरली आहे.
अमेरिकेची ग्लोबल डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कनसल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सनुसार १४ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रेटिंग ६८ टक्के झाली आहे. ही रेटिंग वर्षाच्या सुरुवातीला ६२ टक्क्यांवर होती. मोदींना कोरोनावरील उपाययोजना आणि लोकांचा लॉकडाऊनच्या आवाहनाला पाठिंबा याचा फायदा झाला आहे. त्यांनी २५ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर हा लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिलवरून वाढवून ३ मे केला होता. या काळात त्यांनी दोनदा देशातील लोकांना थाळीनाद आणि दिवा लावण्याचे आवाहन केले होते. याला परदेशातील भारतीयांकडूनही प्रतिसाद मिळाला होता.
एवढेच नाही तर मोदींनी जागतिक नेत्यांना कोरोनाच्या लढाईमध्ये एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. सार्क देशांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेले आवाहन किंवा जी २० देशांची बैठक घेण्यासाठी केलेले प्रयत्न आदींचा समावेश आहे. तसेच जगभरातील देशांना कोरोनाविरोधात लढण्यासाठी हायड्रॉक्सिक्लोरिक्वीन या औषधाचा पुरवठाही तेवढाच लोकप्रियता वाढविण्यासाठी महत्वाचा ठरला आहे.
ट्रम्प यांची रेटिंग घसरलीमार्चच्या मध्यावर अमेरिकेमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आले. तेव्हा ट्रम्प यांची लोकप्रियता ४९ टक्क्यांवर होती. ती आता ४३ टक्क्यांवर आली आहे. अमेरिकेमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत ४०००० जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. तसेच कोरोनाचे संकट ट्रम्प यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनविण्याच्या आड येऊ लागले आहे. लोकप्रियतेच्या सुचीमध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो आबे सर्वात खालच्या क्रमांकावर आहेत. तर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रे मैन्युअल लोपेज ओब्राडार दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
आणखी वाचा...
उद्धव ठाकरेंचं 'भविष्य' राजधानीत ठरणार; राज्यपाल थेट दिल्लीशी बोलणार!
लॉकडाऊनमध्ये Jio चे नशीब फळफळले; फेसबुकने 43574 कोटी रुपये गुंतवले
एड्स, स्वाईन फ्ल्यू अमेरिकेतून पसरला; कोणी जबाबदार धरले का? चीनचा सवाल